Wednesday 8 January 2014

आलू टिक्की

साहित्य 

६ ते ७ मध्यम आकाराचे बटाटे,
२ ते ३ हिरव्या मिरच्या,
१ टी स्पून आमचूर पावडर,
१ टी स्पून जिरे पावडर,
१ टी स्पून लाल मिरची पावडर,
१ टी स्पून आले पेस्ट,
१ टेबल स्पून बारीक चिरलेली कोथिंबीर,
मीठ चवीनुसार,
तेल अंदाजे.

कृती 

बटाटे उकडून त्यांची साल काढून घ्या. हे बटाटे थंड झाल्यावर हाताने कुस्करून घ्या.
आता त्यात हिरव्या मिरच्या (आवडीनुसार ) बारीक चिरून, आमचूर पावडर, जिरे पावडर, लाल मिरची पावडर, आले पेस्ट, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घाला व हाताने मिश्रण एकजीव करा. 
         आता हाताला तेल लावून त्यावर छोटे छोटे वरील मिश्रणाचे गोळे तयार करा. दोन्ही हाताने गोळ्याला मध्ये थोडा दाब देवून चपटे करून घ्या.
          आता एका पसरट पॅन मध्ये थोडेसे तेल गरम करून त्यावर ह्या पॅटीज दोन्ही बाजूनी सोनेरी तांबूस होईपर्यंत भाजून घ्या.

चिंचेच्या चटणीबरोबर आलू टिक्की सर्व करा.

कांदा भजी

साहित्य 

दीड कप बेसन पीठ,
२ मध्यम  आकाराचे कांदे,
२ टी स्पून ओवा,
अर्धा टी स्पून लाल मिरची पावडर,
१ टेबल स्पून बारीक चिरलेली कोथिंबीर,
मीठ चवीनुसार,
तेल तळण्यासाठी,
पाणी अंदाजे.

कृती 

कांदे लांबट आकाराचे चिरून घ्या. एका खोलगट भांड्यात बेसन पीठ, चिरलेले कांदे, ओवा. लाल मिरची पावडर, कोथिंबीर व चवीनुसार मीठ घालून मिश्रण एकजीव करा व पाणी सुटण्यासाठी १० ते १५ मिनिटे  ठेवून द्या.
आता वरील मिश्रणात अंदाजे पाणी घालत मिश्रणाची जाडसर पेस्ट करून घ्या.
         एका खोलगट पॅन मध्ये तळण्यासाठी तेल गरम करून घ्या. तेल व्यवस्थित तापल्यावर हाताने त्यात थोडे थोडे वरील मिश्रण सोडा. भजी लालसर होईपर्यंत तळून बाहेर काढा.

पुदिना किंवा चिंचेच्या चटणीबरोबर गरम गरम कांदा भजी वाढा.

तीळ भात

साहित्य 

२ कप बासमती तांदूळ,
१ कप तीळ,
२ ते ३ टेबल स्पून तिळाचे तेल,
१ टी स्पून मोहरी,
१० ते १२ कडीपत्ता पाने,
अर्धा टेबल स्पून लिंबाचा रस,
मीठ चवीनुसार,
पाणी अंदाजे.

कृती 

तांदूळ स्वच्छ धुवून एका खोलगट भांड्यात घ्या. त्यात अंदाजे पाणी व चवीनुसार मीठ घालून एक उकळी काढा. आता घट्ट झाकण लावून मंद आचेवर भात २० ते २२ मिनिटे शिजू द्या.
          आता एका पॅन मध्ये तिळाचे तेल (अंदाजे ) गरम करून त्यात मोहरी, कडीपत्ता पाने टाका.मोहरी तडतडू द्या. कडीपत्ता पाने तांबूस रंगाची होईपर्यंत परतून घ्या. आता त्यात तीळ टाका. चमच्याने मिश्रण सारखे हलवत राहा. मंद आचेवर तीळ सोनेरी तांबूस होईपर्यंत परतून घ्या. 
            आता भातामध्ये वरील मिश्रण घाला व चमच्याने ढवळून एकजीव करा. चवीनुसार लिंबाचा रस त्यात घाला.

आमटी बरोबर गरम गरम वाढा.

पनीर भाजी

साहित्य 

३०० ग्रॅम पनीर,
१ मध्यम आकाराचा कांदा,
४  मध्यम आकाराचे टोमॅटो,
२ ते ३ हिरव्या मिरच्या,
१ टी स्पून आले पेस्ट,
अर्धा टी स्पून लाल तिखट,
अर्धा टी स्पून गरम मसाला,
१ टेबल स्पून कोथिंबीर बारीक चिरून,
२ टेबल स्पून टोमॅटो सॉस,
३ ते ४ टेबल स्पून तूप किंवा लोणी,
२ ते ३ वेलची ठेचलेली,
पाव कप दही,
अर्धा कप दुध,
मीठ चवीनुसार,
अंदाजे पाणी.

कृती 

सुमारे पाव किलो पनीरचे बारीक १ ते २ इंच आकाराचे तुकडे करून बाजूला ठेऊन द्या.
कांद्याचे उभे लांबसर तुकडे करून घ्या. मिरच्या व टोमॅटो  बारीक  चिरून घ्या. एका खोलगट भांड्यात अर्धे तूप किंवा लोणी गरम करा. त्यात कांदे, चिरलेल्या मिरच्या व वेलच्या (ठेचून), आले पेस्ट टाका. कांदे सोनेरी तांबूस होईपर्यंत परतून घ्या.आता त्यात बारीक चिरलेला टोमॅटो टाका व मंद आचेवर ८ ते १० मिनिटांसाठी मिश्रण परतून घ्या.
आता त्यात दही घालून मिश्रण ५ ते ६ मिनिटे शिजवून घ्या. आता वरील मिश्रणात अंदाजे अर्धा कप पाणी घालून मिश्रण थंड होण्यासाठी ठेवून द्या.   
          आता वरील मिश्रण मिक्सर मध्ये लावून एकदम बारीक पेस्ट करून घ्या.
आता उरलेले तूप किंवा लोणी एका खोलगट भांड्यात गरम करून त्यात वरील मिश्रण टाका. त्यात गरम मसाला, लाल तिखट, टोमॅटो सॉस, चवीनुसार मीठ टाका व मिश्रण ढवळून एकजीव करा. मिश्रणाला एक उकळी काढून मिश्रण घट्ट होईपर्यंत मंद आचेवर ठेवा.
           वाढण्याआधी मिश्रण गरम करा आणि त्यात दुध आणि पनीरचे तुकडे टाका आणि ३ ते ४ मिनिटांसाठी एक उकळी काढून घ्या. उरलेले पनीर किसून आणि कोथिंबीर बारीक चिरून वरून पसरून टाका.

पराठ्याबरोबर गरम गरम वाढा.

साउथ इंडिअन भात ( दह्यातला भात )

साहित्य 

अडीच कप बासमती तांदूळ,
३ ते ४ कप दही,
१ टी स्पून जिरे,
१ टी स्पून मोहरी,
पाव टी स्पून हिंग पावडर,
३ ते ४ लाल मिरच्या,
१ टेबल स्पून उडीद डाळ,
२ टेबल स्पून तूप किंवा तेल,
४ ते ५ कप पाणी,
मीठ चवीनुसार.

कृती 

          तांदूळ स्वच्छ धुवून थोडावेळ त्यातले पाणी काढून ठेवून द्या.
एका खोलगट भांड्यात तांदूळ घेऊन त्यात अंदाजे पाणी व मीठ घालून एक उकळी काढा. आता भात मंद आचेवर घट्ट झाकण लावून शिजण्यास २० ते २५ मिनिटांसाठी ठेवून द्या. भात शिजल्यावर तो बाजूला थंड होण्यासाठी ठेवून द्या.
          आता एका पॅन मध्ये तेल किंवा तूप घेऊन त्यात जिरे, मोहरी आणि हिंग पावडर घालून मोहरी तडतडू द्या. आता त्यात उडीद डाळ घाला. उडीद डाळ तांबूस सोनेरी होईपर्यंत परतून घ्या. लाल मिरच्या (अंदाजे ) त्यांची पोटे फोडून अक्ख्या वरील फोडणीत घाला व २ ते ३ मिनिटांसाठी परतून घ्या.
            एका भांड्यात दही घेऊन त्यात हि फोडणी वरून घाला व चमच्याने ढवळून मिश्रण एकजीव करा. चवीनुसार मीठ घाला.
             एका खोलगट भांड्यात भात घेऊन त्यात वरील मिश्रण घाला व चमच्याने ढवळून भात व दही एकजीव करा. दही आवडीनुसार कमी किंवा जास्त वापरू शकता.

हा भात थंडच जेवताना वाढा.



Thursday 26 December 2013

गोबी मंचुरिअन

साहित्य 

१ मध्यम आकाराचा कॉलीफ्लॉवर ,
१ मध्यम आकाराचा कांदा,
१ टी स्पून आले पेस्ट,
२ टी स्पून लसूण पेस्ट,
२ ते ३ टेबल स्पून कॉर्न फ्लोर,
पाव कप गव्हाचे पीठ,
पाव टी स्पून लाल मिरची पावडर,
२ ते ३ लाल मिरच्या,
३ ते ४ टेबल स्पून तेल,
मंचुरिअन  सॉस आवडीप्रमाणे,
२ कप पाणी,
मीठ चवीनुसार.

कृती 

कॉलीफ्लॉवर  चे तुरे व्यवस्थित कापून घ्या. १ ते २ वेळा धुवून स्वच्छ करून  घ्या. एका खोलगट भांड्यात पाणी गरम करून त्यात हे तुरे ४ ते ५ मिनिटांसाठी उकळून घ्या. हे तुरे पाण्यातून बाजूला एका कोरड्या कापडावर ठेवून द्या.
            आता एका भांड्यामध्ये पाव कप गव्हाचे पीठ, २ टेबल स्पून कॉर्न फ्लोर, प्रत्येकी पाव चमचा आले पेस्ट, लसूण पेस्ट, लाल मिरची पावडर, आणि चवीप्रमाणे मीठ एकत्र करा. त्यात अंदाजे पाणी घालत भज्याच्या पिठाप्रमाणे पीठ तयार करून घ्या.
             बाजूला ठेवलेले तुरे वरील मिश्रणात व्यवस्थित बुडवून घ्या. आता एका खोलगट पॅन मध्ये तेल गरम करून त्यातून हे तुरे तळून काढा व बाजूला ठेवून द्या.
             आता उरलेल्या तेलामध्ये शिल्लक राहिलेले लसूण पेस्ट व आले पेस्ट आणि ठेचलेल्या लाल मिरच्या 
( आवडीनुसार ) घालून मिश्रण १ ते २ मिनिटांसाठी परतून घ्या. आता त्यात कांदा बारीक चिरून घाला चवीनुसार मीठ घाला. कांदा हलकासा सोनेरी तांबूस झाल्यावर त्यात दीड कप पाणी घाला व एक उकळी काढा.
             आता उरलेले  कॉर्न फ्लोर अर्धा कप पाण्यात व्यवस्थित मिसळून घ्या. हे मिश्रण वरील मिश्रणात हलके हलके मिसळा. मिसळताना चमच्याने सारखे ढवळत राहा. आता ५ ते ७ मिनिटांसाठी हे मिश्रण मंद आचेवर ठेवा. 
             आता वरील मिश्रणात कॉलीफ्लॉवर  चे तुरे व्यवस्थित हलक्या हाताने मिसळा तसेच मंचुरिअन  सॉस ( आवडीप्रमाणे ) घाला. १ ते २ मिनिटांसाठी मध्यम आचेवर ठेवून एक उकळी काढा.

भाताबरोबर गरम गरम सर्व करा.


पुलाव ( प्रकार २)

साहित्य 

३ कप बासमती तांदूळ,
२ ते ३ टोमॅटो,
४ ते ५ लसून पाकळ्या,
१ टेबल स्पून आले पेस्ट,
४ ते ५ काळी मिरी,
२ ते ३ लवंगा,
१ मध्यम कांदा,
६ ते ८ टी स्पून तूप,
पाणी अंदाजे,
मीठ चवीनुसार.

कृती 

         तांदूळ स्वच्छ धुवून घ्या व बाजूला काढून ठेवा.
एका खोलगट पॅन मध्ये तूप मध्यम आचेवर गरम करा. कांदा बारीक चिरून घ्या व तो त्या पॅन मध्ये सोनेरी तांबूस होईपर्यंत भाजून घ्या. त्यात आले पेस्ट, लसणाचे बारीक तुकडे करून, काळी मिरी ( आवडीनुसार ), लवंगा (आवडीनुसार ) घाला व २ ते ३ मिनिटांसाठी मिश्रण परतून घ्या. त्यात चवीनुसार मीठ घाला.
          मिक्सर ला लावून टोमॅटोची पातळ पेस्ट करून घ्या. ती पेस्ट वरील मिश्रणात घाला व चमच्याने ढवळून मिश्रण एकजीव करा. १ ते २ मिनिटानंतर त्यात बासमती तांदूळ घाला. १ ते २ मिनिटांसाठी मिश्रण परतून घ्या. चमच्याने हळुवार ढवळत रहा जेणेकरून तांदळाला सर्व मिश्रण लागेल.
          आता त्यात अंदाजे पाणी घालून पॅनला घट्ट झाकण लावून भात शिजू द्या.

आमटीबरोबर गरम गरम सर्व करा.