Thursday 26 December 2013

गोबी मंचुरिअन

साहित्य 

१ मध्यम आकाराचा कॉलीफ्लॉवर ,
१ मध्यम आकाराचा कांदा,
१ टी स्पून आले पेस्ट,
२ टी स्पून लसूण पेस्ट,
२ ते ३ टेबल स्पून कॉर्न फ्लोर,
पाव कप गव्हाचे पीठ,
पाव टी स्पून लाल मिरची पावडर,
२ ते ३ लाल मिरच्या,
३ ते ४ टेबल स्पून तेल,
मंचुरिअन  सॉस आवडीप्रमाणे,
२ कप पाणी,
मीठ चवीनुसार.

कृती 

कॉलीफ्लॉवर  चे तुरे व्यवस्थित कापून घ्या. १ ते २ वेळा धुवून स्वच्छ करून  घ्या. एका खोलगट भांड्यात पाणी गरम करून त्यात हे तुरे ४ ते ५ मिनिटांसाठी उकळून घ्या. हे तुरे पाण्यातून बाजूला एका कोरड्या कापडावर ठेवून द्या.
            आता एका भांड्यामध्ये पाव कप गव्हाचे पीठ, २ टेबल स्पून कॉर्न फ्लोर, प्रत्येकी पाव चमचा आले पेस्ट, लसूण पेस्ट, लाल मिरची पावडर, आणि चवीप्रमाणे मीठ एकत्र करा. त्यात अंदाजे पाणी घालत भज्याच्या पिठाप्रमाणे पीठ तयार करून घ्या.
             बाजूला ठेवलेले तुरे वरील मिश्रणात व्यवस्थित बुडवून घ्या. आता एका खोलगट पॅन मध्ये तेल गरम करून त्यातून हे तुरे तळून काढा व बाजूला ठेवून द्या.
             आता उरलेल्या तेलामध्ये शिल्लक राहिलेले लसूण पेस्ट व आले पेस्ट आणि ठेचलेल्या लाल मिरच्या 
( आवडीनुसार ) घालून मिश्रण १ ते २ मिनिटांसाठी परतून घ्या. आता त्यात कांदा बारीक चिरून घाला चवीनुसार मीठ घाला. कांदा हलकासा सोनेरी तांबूस झाल्यावर त्यात दीड कप पाणी घाला व एक उकळी काढा.
             आता उरलेले  कॉर्न फ्लोर अर्धा कप पाण्यात व्यवस्थित मिसळून घ्या. हे मिश्रण वरील मिश्रणात हलके हलके मिसळा. मिसळताना चमच्याने सारखे ढवळत राहा. आता ५ ते ७ मिनिटांसाठी हे मिश्रण मंद आचेवर ठेवा. 
             आता वरील मिश्रणात कॉलीफ्लॉवर  चे तुरे व्यवस्थित हलक्या हाताने मिसळा तसेच मंचुरिअन  सॉस ( आवडीप्रमाणे ) घाला. १ ते २ मिनिटांसाठी मध्यम आचेवर ठेवून एक उकळी काढा.

भाताबरोबर गरम गरम सर्व करा.


पुलाव ( प्रकार २)

साहित्य 

३ कप बासमती तांदूळ,
२ ते ३ टोमॅटो,
४ ते ५ लसून पाकळ्या,
१ टेबल स्पून आले पेस्ट,
४ ते ५ काळी मिरी,
२ ते ३ लवंगा,
१ मध्यम कांदा,
६ ते ८ टी स्पून तूप,
पाणी अंदाजे,
मीठ चवीनुसार.

कृती 

         तांदूळ स्वच्छ धुवून घ्या व बाजूला काढून ठेवा.
एका खोलगट पॅन मध्ये तूप मध्यम आचेवर गरम करा. कांदा बारीक चिरून घ्या व तो त्या पॅन मध्ये सोनेरी तांबूस होईपर्यंत भाजून घ्या. त्यात आले पेस्ट, लसणाचे बारीक तुकडे करून, काळी मिरी ( आवडीनुसार ), लवंगा (आवडीनुसार ) घाला व २ ते ३ मिनिटांसाठी मिश्रण परतून घ्या. त्यात चवीनुसार मीठ घाला.
          मिक्सर ला लावून टोमॅटोची पातळ पेस्ट करून घ्या. ती पेस्ट वरील मिश्रणात घाला व चमच्याने ढवळून मिश्रण एकजीव करा. १ ते २ मिनिटानंतर त्यात बासमती तांदूळ घाला. १ ते २ मिनिटांसाठी मिश्रण परतून घ्या. चमच्याने हळुवार ढवळत रहा जेणेकरून तांदळाला सर्व मिश्रण लागेल.
          आता त्यात अंदाजे पाणी घालून पॅनला घट्ट झाकण लावून भात शिजू द्या.

आमटीबरोबर गरम गरम सर्व करा.

         

घी राईस

साहित्य 

१ कप बासमती तांदूळ,
१ ते २ मध्यम कांदे,
२ ते ३ हिरव्या मिरच्या,
अर्धा टी स्पून जिरे,
१ लवंग,
१ टी स्पून आले पेस्ट,
१ टी स्पून लसून पेस्ट,
७ ते ८ सुके काजू,
१ टेबल स्पून तूप  ( घी ),
१ टेबल स्पून बारीक चिरलेली कोथिंबीर,
पाणी अंदाजे,
मीठ चवीनुसार.

कृती 

तांदूळ पाण्याने स्वच्छ धुवून १० मिनिटांसाठी बाजूला ठेवून द्या.
एका खोलगट भांड्यात तूप घेऊन त्यात जिरे, लवंग, आले-लसून पेस्ट , काजू , हिरव्या मिरच्या तुकडे करून टाका व मिश्रण हलवून घ्या. मंद आचेवर १ ते २ मिनिटे ठेवा. आता त्यात कांदे बारीक चिरून टाका व सोनेरी तांबूस होईपर्यंत भाजून घ्या. आता त्यात तांदूळ घाला व मिश्रण चमच्याने हलवून एकजीव करा. २ ते ३ मिनिटांसाठी मंद आचेवर ठेवा. चमच्याने मिश्रण सारखे हलवत राहा.
           आता त्यात २ कप ( अंदाजे ) पाणी व चवीनुसार मीठ घालून भात मंद आचेवर शिजू द्या. 

 गरम गरम भातावर कोथिंबीर पसरून कोशिंबीरीबरोबर सर्व करा.

Wednesday 25 December 2013

टोमॅटो भात

साहित्य 

१ कप बासमती तांदूळ,
२ ते ३ मध्यम टोमॅटो,
१ ते २ मध्यम कांदे,
२ ते ३ हिरव्या मिरच्या,
अर्धा टेबल स्पून आले पेस्ट,
अर्धा टेबल स्पून लसून पेस्ट,
१ टेबल स्पून बारीक चिरलेली कोथिंबीर,
१ ते २ लवंगा,
अर्धा टी स्पून काळी मिरी पावडर,
अर्धा टी स्पून दालचिनी पावडर,
१ ते २ वेलदोडे ठेचून,
१ तमाल पत्री,
तेल आवश्यकतेनुसार,
मीठ चवीनुसार.

कृती 

 तांदूळ २ ते ३ वेळा स्वच्छ धुवून १० मिनिटांसाठी बाजूला ठेवा.
               एका खोलगट पॅन मध्ये आले पेस्ट, लसून पेस्ट, लवंगा, मिरी पावडर, दालचिनी पावडर, वेलदोडे ठेचून, तमाल पत्री आणि कांदे बारीक चिरून टाका. तेल आवश्यकतेनुसार वापरा. कांदे तांबूस सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या. चमच्याने मिश्रण हलवत राहा. ५ ते १० मिनिटे मंद आचेवर ठेवा व चवीनुसार मीठ घाला.
              आता टोमॅटो बारीक चिरून वरील मिश्रणात टाका आणि चमच्याने हलवून मिश्रण एकजीव करा. १ ते २ मिनिटे मंद आचेवर ठेवा.
               आता त्यात तांदूळ घाला व पुन्हा मिश्रण एकजीव करा. ३ ते ४ मिनिटांसाठी मिश्रण मंद आचेवर ठेवा व चमच्याने हलवत राहा जेणेकरून तांदळाला सर्व मिश्रण लागेल. आता त्यात अंदाजे पाणी घालून मिश्रण एकजीव करा. भात शिजेपर्यंत घट्ट झाकण लावून मंद आचेवर ठेवा.

वाढताना कोथिंबीर बारीक चिरून भातावर पसरवा व गरम गरम सर्व करा. 
               
 

Tuesday 24 December 2013

पुलाव ( प्रकार १ )

साहित्य 

अडीच कप बासमती तांदूळ,
३ टेबल स्पून तूप किंवा तेल,
१ ते २ मध्यम आकाराचे कांदे,
२ दालचिनी काड्या,
६ वेलची ठेचलेल्या,
५ ते ६ लवंगा,
१० ते १२ काळी मिरी,
४ ते ५ कप पाणी,
मीठ आवडीनुसार.

कृती 

बासमती तांदूळ २ ते ३ वेळा पाण्यामध्ये धुवून घ्या व तासाभरासाठी भिजत ठेवा. नंतर त्यातील पाणी काढून बाजूला ठेवून द्या.
             एका खोलगट पॅन मध्ये तेल किंवा तूप गरम करा. त्यात दालचिनी, वेलची, लवंगा, काळी मिरी घाला.
आता दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून वरील मिश्रणात घाला. मंद आचेवर कांदा तांबूस सोनेरी होईपर्यंत परतून घ्या.
             आता त्यात तांदूळ घाला व मिश्रण ढवळून एकजीव करा. ३ ते ४ मिनिट मंद आचेवर ठेवा व मिश्रण सारखे हलवत राहा. आता त्यात अंदाजे पाणी घालून एक उकळी काढा. 
             मंद आचेवर पॅनला घट्ट झाकण लावून २० ते २५ मिनिटे भात शिजू द्या. आता भातावर असलेले  अख्खे मसाले बाजूला काढून टाका.

पुलाव गरम गरम आमटी बरोबर सर्व करा.
 

राजमा भात

साहित्य 

दीड वाटी  बासमती तांदूळ,
अर्धी  वाटी राजमा,
अर्धा टी स्पून सांबार मसाला,
१ टी स्पून लाल मिरीची पूड,
पाव टी स्पून हळद पावडर,
२ लाल मिरच्या,
३ ते ४ कडीपत्ता पाने,
१ मध्यम कांदा,
१ मध्यम टोमॅटो,
१ टेबल स्पून कोथिंबीर बारीक चिरलेली,
अर्धा टेबल स्पून जिरे,
अर्धा टेबल स्पून मोहरी,
अर्धा टेबल स्पून उडीद डाळ,
३ टेबल स्पून तेल,
१ टेबल स्पून लिंबाचा रस,
मीठ आवश्यकतेनुसार.

कृती 

राजमा रात्रभर पाण्यामध्ये भिजवून ठेवा. भिजवलेला राजमा कुकरला लावून १ ते २ शिट्या काढून घ्या.
राजमा त्यातील पाणी काढून बाजूला थंड करण्यासाठी ठेवून द्या .
बासमती तांदूळ अर्धा तास पाण्यात भिजवून घ्या. हा तांदूळ पण कुकरला लावून १ ते २ शिट्या काढून घ्या.
तांदूळ बाजूला थंड होण्यासाठी ठेवून द्या.
             एका खोलगट पॅन  मध्ये तेल गरम करून त्यात जिरे, मोहरी, उडीद डाळ टाका. मोहरी तडतडल्यावर 
त्यामध्ये कडीपत्ता पाने, आणि अक्ख्या लाल मिरच्या टाका. मिश्रण हलवून एकजीव करा.
आता एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून वरील मिश्रणात घाला व गुलाबी होईपर्यंत मध्यम आचेवर परतून घ्या.
             आता वरील मिश्रणात सांबार मसाला, हळद, मिरीची पुड, राजमा, लिंबाचा रस आणि मीठ (चवीप्रमाणे ) घालून मिश्रण एकजीव करा. आता त्यात एक टोमॅटो बारीक चिरून घाला व मिश्रण ढवळून एकजीव करा.
              आता त्यात तांदूळ घालून चमच्याने हळुवार मिश्रण एकजीव करा जेणेकरून तांदळाला सर्व मिश्रण लागेल. मंद आचेवर २ ते ३ मिनिटे झाकण लावून भात शिजू द्या.

बारीक चिरलेली कोथिंबीर भातावर पसरवून गरम गरम वाढा.

Saturday 12 October 2013

कोबी वडे

साहित्य 

एक वाटी बारीक चिरलेला कोबी,
अर्धा वाटी हरभरा डाळीचे पीठ,
३ ते ४ हिरव्या मिरच्या,
अर्धा टी स्पून हळद,
अर्धा टी स्पून जिरे,
एक टी स्पून आले लसूण पेस्ट,
अंदाजे तेल,
मीठ चवीनुसार.

कृती

एका खोलगट भांड्यात बारीक चिरलेला कोबी, डाळीचे पीठ, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या ( आवडीनुसार ) एकत्र करा. आता त्यात हळद, जिरे आणि आले लसूण पेस्ट घालून मिश्रण एकजीव करा.
   आता अंदाजे पाणी घालत कणके सारखे घट्ट पीठ माळून घ्या. आता या कणकेच्या सुरळ्या करून त्या कुकरमध्ये वाफवून घ्या. किंवा एका खोलगट भांड्यात पाणी घेऊन त्यावर चाळणीत ह्या सुरळ्या ठेऊन वाफवून घ्या. 
    सुरळ्या थंड झाल्यावर त्यांचे काप करा व गरम तेलात तळा किंवा फोडणीवर परतून घ्या.

जेवताना चटणीबरोबर सर्व करा कोबी वडे.

मेथीचे वडे

साहित्य 

एक वाटी हरभरा डाळ पीठ,
पाव वाटी मैदा,
एक वाटी चिरलेली मेथी,
एक टी स्पून मेथी पावडर,
एक टी स्पून तीळ,
एक टी स्पून हळद,
अर्धा टी स्पून हिंग पावडर,
एक टेबल स्पून रवा भाजून,
तेल आवश्यकतेनुसार,
मीठ चवीनुसार.

कृती 

डाळीचे पीठ, रवा, मैदा, बारीक चिरलेली मेथी एका भांड्यात एकत्र करा . 
आता त्या मिश्रणात हळद, हिंग, मेथी पावडर आणि चवीनुसार मीठ टाकून मिश्रण एकजीव करा.
अंदाजे २ टी स्पून गरम तेल घाला. आता अंदाजे पाणी घालत घट्ट कणिक मळून घ्या.
आता त्या पिठाची सुरळी करा. एका कुकरच्या भांड्यात ह्या सुरळ्या ठेऊन वाफवून घ्या  किंवा
एका खोलगट पातेल्यात पाणी घेऊन त्यावर चाळणीत सुरळ्या ठेवा व झाकण लावून वाफवून घ्या.
व्यवस्थित वाफवल्यावर त्या थंड होऊ द्या. आता त्यांचे चाकूने अंदाजे काप करा.
        हे काप गरम तेलात टाळून काढा अथवा त्यांना फोडणी द्या.

जेवताना चटणीबरोबर सर्व करा मेथीचे वडे.


Monday 5 August 2013

पालक पराठा

साहित्य 

२ वाट्या चिरलेला पालक,
१ वाटी गव्हाचे पीठ,
पाव वाटी चणा डाळीचे पीठ,
३ ते ४ हिरव्या मिरच्या,
१ टी स्पून लसून पेस्ट,
१ टी स्पून जिरे पावडर,
तेल अंदाजे,
मीठ चवीनुसार.

कृती

 गरम पाण्यात पालक पाने  २ ते ३ मिनिटांसाठी भिजवून घ्या. आता एका खोलगट भांड्यात गव्हाचे पीठ, डाळीचे पीठ, बारीक केलेली हिरवी मिरची ( आवडीनुसार ), लसून पेस्ट, जिरे पावडर, आणि पालक यांचे मिश्रण तयार करा. आता त्यात अंदाजे पाणी घालत कणिक मळून घ्या. थोडे तेल कणकेला लावा. हि कणिक तासाभरासाठी मुरत ठेवा. 
          आता त्या कणकेचे गोळे तयार करून चपातीप्रमाणे  लाटून घ्या. एका पॅनला तेल लावून त्यावर हे पराठे खरपूस भाजून घ्या. आवश्यकतेनुसार बाजूने तेल सोडा.

पुदिन्याच्या चटणी बरोबर किंवा कुठल्याही चटणी बरोबर गरम गरम पालक पराठे सर्व करा.  

चीज पालक भात

साहित्य 

३ कप पालक पाने,
२ कप बासमती तांदूळ,
१ कप कोबी बारीक लांब चिरून,
१ मध्यम आकाराचा कांदा,
अर्धा कप चीजचे बारीक तुकडे
पाव कप दुध,
४ ते ५ हिरव्या मिरच्या,
१ टेबल स्पून लोणी,
१ टी स्पून आले पेस्ट,
पाव चमचा दालचिनी पावडर,
पाव चमचा लवंग पावडर,
१ टेबल स्पून लिंबाचा रस,
मीठ चवीला.

कृती

एका खोलगट भांड्यात भरपूर पाणी उकळून घ्या. आता त्यात अंदाजे मीठ व १० ते १२ थेंब लिंबाचा रस घालून त्यात तांदूळ घाला व भात शिजवून घ्या. भात थोडासा कमी शिजलेला ठेवा. हा भात एका पसरट प्लेट मध्ये पसरून थंड करून बाजूला ठेवून द्या.
         आता पालक, हिरव्या मिरच्या ( आवडीनुसार ), आणि आले पेस्ट मिक्सर मध्ये बारीक करून घ्या ( पाणी वापरू नका ).
          एका पॅन मध्ये लोणी गरम करून त्यात लवंग-दालचिनी पावडर, हिंग पावडर टाका. मिनिटभर मिश्रण परतून घ्या. आता त्यात लांबसर चिरलेला कांदा टाका व हलका गुलाबी सोनेरी होई पर्यंत परतून घ्या. आता त्यात कोबी लांबसर बारीक चिरून टाका. लिंबाचा रस, आणि पालक पेस्ट टाका. मीठ चवीनुसार टाकून मिश्रण हलवून एकजीव करून घ्या. मंद आचेवर ५ ते ६ मिनिटे मिश्रण परतून घ्या. मधे मधे मिश्रण हलवत राहा.
          आता वरील मसाला थोडासा शिल्लक ठेवून उरलेला भातात टाका. अर्धे चीज थोडेसे ठेचून त्यात टाका व मिश्रण हलक्या हाताने हलवून एकजीव करा.
           आता ओवन च्या खोलगट भांड्यात वरील भात घ्या आणि उरलेला मसाला त्यावर पसरा व एक थर तयार करा. उरेलेल चीज त्यावर सगळीकडे पसरून टाका. दुधही त्यात सगळीकडे पसरून टाका.
           हा भात ओवन मध्ये १५ मिनिटांसाठी फोइल ने झाकून बेक करून घ्या.

गरम गरम भात  

मटार पुलाव

साहित्य 

२ कप बासमती तांदूळ,
दीड कप हिरवे मटार,
अर्धा कप बारीक तुकडे केलेले गाजर,
१ टेबल स्पून तूप,
अर्धा टी स्पून दालचिनी पावडर,
३ ते ४ वेलच्या ठेचून,
३ ते ४ लवंग,
१ टी स्पून जिरे,
अर्धा टी स्पून हळद,
मीठ चवीनुसार.

कृती 

तांदूळ धुवून अर्धा तासासाठी बाजूला ठेवा. एका खोलगट पॅन मध्ये तूप गरम करून त्यात लवंग, दालचिनी पावडर, वेलची आणि जिरे टाका. मिनिटभरासाठी मिश्रण परतवून घ्या. आता त्यात हळद व तांदूळ टाकून मिश्रण एकजीव करून घ्या. अंदाजे ३ ते ४ मिनिटांसाठी मंद आचेवर ठेवा.  
         आता वरील मिश्रणात हिरवे मटार आणि गाजराचे तुकडे टाका. नंतर त्यात अंदाजे गरम पाणी ओतून मिश्रण एकजीव करा. एक उकळी काढा. पॅनला एक घट्ट झाकण लावून २० ते २५ मिनिटे भात मंद आचेवर शिजू द्या. 


गरम गरम भात आमटी बरोबर सर्व करा.

Tuesday 30 July 2013

आलू पालक

साहित्य

१ मध्यम आकाराची पालक जुडी,
२ ते ३ हिरव्या मिरच्या,
१ मध्यम आकाराचा टोमॅटो,
२ मध्यम आकाराचे बटाट,
२ मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून,
२ टी स्पून आले पेस्ट,
अर्धा टी स्पून  स्पून गव्हाचे पीठ,
पाव टी स्पून हिंग पावडर,
अर्धा टी स्पून लोणी,
१ टेबल स्पून लिंबाचा रस,
१ टी स्पून जिरे,
४ टेबल स्पून तूप,
मीठ चवीनुसार.

मसाले 

अर्धा टी स्पून लवंग पावडर,
अर्धा टी स्पून दालचिनी पावडर,
अर्धा टी स्पून गरम मसाला, 
पाव टी स्पून हळद,


कृती

पालक धुवून निवडून घ्या. एका भांड्यात पाणी उकळून त्यात २ ते ३ मिनिटांसाठी पालक बुडवून ठेवा किंवा कुकरमध्ये निवडलेल्या पालकास दोन शिट्या काढून घ्या. आता हा पालक थंड पाण्याच्या धारेखाली धरून लगेच थंड करा. आता मिक्सर मध्ये पालक आणि हिरव्या मिरच्या बारीक करून घ्या. पालकाची बारीक पेस्ट होणार नाही याची काळजी घ्या.
           बटाटे उकडून, सोलून त्यांचे मोठे मोठे तुकडे करून घ्या  एका खोलगट पॅन मध्ये गरम तुपा मध्ये बटाटे चांगले परतून घ्या. बटाटे थोडे तांबूस होऊ द्या. बटाटे बाजूला काढून घ्या.
           आता त्याच पॅन मध्ये जिरे, आले पेस्ट आणि कांदे परतवून घ्या. कांदे सोनेरी तांबूस होऊ द्या. आता त्यात टोमॅटो  बारीक चिरून टाका आणि २ ते ३ मिनिटांसाठी मंद आचेवर मिश्रण परता.
           आता त्यात सर्व मसाले टाकून मिश्रण मंद आचेवर तूप सुटेपर्यंत ठेवा. मधून मधून हलवत राहा जेणेकरून सर्व मसाले एकजीव होतील.
            आता त्यात पालक आणि बटाटे टाका व एक उकळी काढा. त्यात गव्हाचे पीठ टाकून मिश्रण एकजीव करा. २ त ३ मिनिटे मंद आचेवर ठेवा. मिश्रणात लिंबाचा रस टाका.
             सर्व करण्याआधी एका पॅन मध्ये लोणी गरम करून त्यात हिंग पावडर टाका व हे मिश्रण भाजीवर टाका आणि चमच्याने हलवून एकजीव करा.

तंदुरी रोटी किंवा नान बरोबर गरम गरम आलू पालक सर्व करा.



Thursday 25 July 2013

गव्हाची खिचडी

साहित्य 

२ वाट्या गव्हाचा (लापशी) रवा,
पाव वाटी शेंगदाण्याचे कूट,
२ मध्यम आकाराचे बटाटे,
१ मिरची बारीक चिरलेली,
१ टेबल स्पून कोथिंबीर बारीक चिरलेली,
१ टी स्पून जिरे,
२ टेबल स्पून तेल,
१ टेबल स्पून लिंबाचा रस,
साखर आवडीनुसार,
मीठ चवीला.

कृती 

थोड्या तेलावर रवा खरपूस भाजून घ्या वास आला कि थांबा. एका खोलगट पॅन मध्ये तेल गरम करा त्यात मिरची बारीक चिरून व जिरे टाका. बटाटे बारीक चिरून त्यात टाका. एक वाफ काढा. आता त्यात साखर व मीठ घाला. शेंगदाण्याचे कूट घालून मिश्रण हलवून एकजीव करा. आता त्यात गव्हाचा रवा टाका. हलवा व मिश्रण एकजीव करा. आता त्यात अंदाजे गरम पाणी ओतून झाकण लावा. मंद आचेवर मिनिटभर शिजवा व एक वाफ काढा.

गरम गरम खिचडी लिंबाचा रस टाकून सर्व करा.
 

भरली भेंडी

साहित्य 

१० ते १२ कोवळ्या भेंड्या,
१ टेबल स्पून बेसन.

 वाटण 

२ ते ४ कडीपत्ता पाने,
अर्धा टी स्पून धने पूड,
अर्धा टी स्पून जिरे पूड,
अर्धा टी स्पून हळद,
१ टी स्पून लाल तिखट,
१ टेबल स्पून लिंबाचा रस,
२ टेबल स्पून बारीक चिरलेली कोथिंबीर,
१ टेबल स्पून ओले खोबरे बारीक केलेले,
साखर आवडीनुसार,
मीठ चवीला.

कृती 

लहान लहान आकाराच्या कोवळ्या भेंड्या घेऊन त्या ओल्या फडक्याने पुसून कोरड्या करून ठेवाव्यात. वरील सर्व पदार्थ भेंड्या व बेसन पीठ सोडून बाकी मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्यावेत. या वाटणात बेसन पीठ मिसळावे व मिश्रण एकजीव करावे. 
         आता भेंड्याना चाकूने सरळ उभी चीर देऊन घ्यावी. त्यात वरील मिश्रण भरावे. मंद आचेवर एका पॅनला तेल लावून त्यावर भरलेल्या भेंड्या व्यवस्थित लावाव्यात व झाकण ठेवावे. खालच्या बाजूने लालसर झाल्यावर हलक्या हाताने भेंड्या परताव्यात.

चपाती किंवा रोटी बरोबर सर्व करा.


मेथी बेसन

साहित्य 

१ वाटी बेसन,
२ टेबल स्पून तांदूळ पीठ,
एक वाटी मेथीची पाने,
अर्धा टी स्पून हिंग,
अर्धा टी स्पून हळद,
२ टी स्पून जिरे,
२ टेबल स्पून तेल,
मीठ चवीला.

कृती 

एका खोलगट पॅन मध्ये तेल गरम करून हिंग, जिरे यांची फोडणी करा. त्यात हळद घाला त्यावर बारीक  चिरलेली मेथीची पाने घाला. झाकण लावून एक वाफ काढा. आता त्यात बेसन पीठ व तांदूळ पीठ घाला. एकसारखे चमच्याने हलवत राहा.चवीला मीठ घाला.थोडा पाण्याचा शिंतोडा द्या. मेथी पाने व बेसन व्यवस्थित मिसळेपर्यंत हलवत राहा. झाकण टाकून एक वाफ काढा.

खुद्खुदा भात

साहित्य 

१ वाटी तांदूळ,
१ टी स्पून ओवा,
१ टेबल स्पून तूप,
२ चमचे मेतकुट,
मीठ चवीला.

कृती 

एका खोलगट पॅन मध्ये तांदूळ तुपावर परतून घ्या. आता त्यात गरम पाणी ( अंदाजे ) घाला. नंतर त्यात ओवा व मेतकुट घाला चवीस मीठ घाला. मिश्रण चांगले ढवळा. एक वाफ काढा व तांदूळ मंद आचेवर शिजू द्या. पातळ असे ठेवा ( पिण्यास ).

एका मध्यम आकाराच्या कुंड्यात सर्व करा.

Wednesday 24 July 2013

दुधीची खीर

साहित्य 

पाव किलो दुधी,
६ वाट्या दुध,
२ वाट्या साखर,
१ टेबल स्पून गव्हाचे पीठ,
अर्धा टी स्पून वेलची पावडर,
अर्धा टी स्पून खायचा सोडा.

कृती

दुधी किसून घ्या. त्याला थोडा खायचा सोडा लावून तो एका भांड्यात झाकण लावून वाफवून घ्या. मधून मधून दुधी हलवा. एका वाटी दुधात गव्हाची कणिक भिजवून घ्या ( पातळ पेस्ट तयार करा ). 
       आता वाफवलेल्या दुधीत साखर घाला. कणिक लावलेलं दुध घाला व मिश्रण एकजीव करा. नंतर त्यात उरलेलं दुध घाला आणि वेलची पावडर घाला. एक उकळी काढा.

जेवणात स्वीट डिश म्हणून सर्व करा.

पालक वडे

साहित्य 

१ जुडी बारीक चिरलेला पालक,
१ वाटी मुगडाळ,
१ वाटी चणाडाळ,
१ पळी शिजलेला भात,
१ मध्यम आकाराचा उकडलेला बटाटा,
अर्धा टेबल स्पून लिंबाचा रस,
तेल तळण्यासाठी,
साखर चवीला,
मीठ अंदाजे.

हिरवा मसाला 

३ ते ४ हिरव्या मिरच्या,
३ ते ४ पाकळ्या लसूण,
२ टी स्पून आले पेस्ट,
२ टी स्पून जिरे,
२ टी स्पून तीळ.

कृती 

मुगडाळ व चणाडाळ तासभरासाठी भिजत घाला. व्यवस्थित भिजल्यावर मिक्सरमध्ये भरडून घ्या.
आता त्यात बारीक चिरलेला पालक, एक पळी भात, उकडलेला बटाटा कुसकरून आणि हिरवा मसाला पेस्ट करून घाला. चवीस साखर व मीठ घाला. मिश्रण हाताने एकजीव करा.
         आता त्या मिश्रणाचे मध्यम गोळे हातावर तयार करून किंवा नेहमीच्या वड्यानसारखा आकार देऊन गरम तेलात तळून काढा.

तिखट चटणीबरोबर गरम गरम पालक वडे सर्व करा.

दह्यातील साबुदाणा

साहित्य 

२ वाट्या साबुदाणा,
१ वाटी घट्ट दही,
३ वाट्या ताक,
४ ते ५ हिरव्या मिरच्या,
१ वाटी ओल्या नारळाचा चव,
अर्धी वाटी शेंगदाणे कूट,
१ टेबल स्पुन बारीक चीरेलेली कोथिंबीर,
२ टी स्पून जिरे,
अर्धा टेबल स्पून तूप,
साखर आवडीनुसार,
मीठ चवीला.

कृती 

साबुदाणा मंद आचेवर अर्धा मिनिटभर पॅन मध्ये भाजून घ्या. एका खोलगट भांड्यात ताक घेऊन त्यात हा साबुदाणा घाला ( ताक आवश्यकतेनुसार कमी किंवा जास्त वापरा ). साधारण एक तास ठेवल्यावर साबुदाणा फुलून येईल. तो चमच्याने मोकळा करा. त्यात शेंगदाण्याचे कूट घाला व मिश्रण एकजीव करा.
        आता एका पॅन मध्ये तुपात बारीक चिरलेली मिरची व जीऱ्याची फोडणी करून ती साबुदाण्यावर घाला व मिश्रण हलवून सगळ्या साबुदाण्याला लावा.  

साबुदाण्यावर घट्ट दही आणि ओल्या नारळाचा चव घाला आणि बारीक चिरलेली कोथिंबीर पसरून सर्व करा  

आंब्याची डाळ

साहित्य 

२ वाट्या चणा डाळ,
२ मध्यम आकाराच्या कैऱ्या,
मीठ चवीला.

कृती

डाळीत घालावयाची कैरी किसून घ्या व त्याला मीठ लावून १ ते २ तास ठेवा म्हणजे कैरीचा आंबटपणा उतरेल. डाळ ३ ते ४ वेळा पाण्याने धुवून स्वच्छ करा आणि तासभर भिजत घाला. त्यामुळे डाळीचा उग्र वास निघून जाईल.
       आता ही डाळ वाटून घ्या व त्यात कैरीचा कीस घाला आणि मिश्रण एकजीव करा जेणेकरून कैरीची आंबट चव डाळीला लागेल.

हि डाळ जेवणाची चव वाढवते.


टोमॅटोची भाजी

साहित्य 

अर्धा किलो पिकलेले टोमॅटो,
पाव किलो शिमला मिरची,
पाव किलो कांदे,
१ टी स्पून लाल तिखट,
अर्धा टी स्पून धने पावडर,
अर्धा टी स्पून जिरे पावडर,
२ टेबल स्पून तेल,
२ टी स्पून साखर.

कृती 

एका भांड्यात पाणी उकळा. त्यात टोमॅटो व शिमला मिरची २ ते ३ मिनिटांसाठी बुडवून भांड्यावर झाकण लावून ठेवा. नंतर थंड पाण्याच्या धारेखाली धरून थंड करा व त्यांची साले काढून घ्या. आता कांदे, टोमॅटो,
आणि शिमला मिरचीचे उभे काप करून घ्या.
        एका खोलगट पॅन मध्ये तेल तापवून त्यावर वरील भाज्या व कांद्याचे काप टाका. आता त्यात धने-जिरे पावडर आणि लाल तिखट टाका. चवीला मीठ टाका व मिश्रण एकजीव करा. झाकण लावून २ ते ३ मिनिटे मंद आचेवर भाज्या शिजू द्या. साधारण शिजल्या कि त्यात साखर टाका. भाज्या शिजून त्यांचा रस दाट झाला की पॅन उतरा.

चपाती बरोबर सर्व करा.

Tuesday 23 July 2013

लाल भोपळ्याचे रायते

साहित्य

अर्धा मध्यम आकाराचा लाल भोपळा,
१ वाटी दही,
१ टेबल स्पून तूप,
२ टी स्पून जिरे,
१ हिरवी मिरची,
साखर चवीला,
मीठ अंदाजे.

कृती

भोपळ्याचे लांबट तुकडे करून ते कुकर मध्ये एक शिटी काढून वाफवून घ्या. त्यातील जास्त पाणी काढून टाका.
चवीपुरते मीठ व साखर त्या तुकड्यांना लावा.
      आता एका पॅन मध्ये गरम तुपावर जिरे टाकून फोडणी करावी, त्यात एक मिरची बारीक चिरून घालावी.
हि फोडणी त्या फोडींवर घालून फोडी वरखाली कराव्यात जेणेकरून फोडणी सर्व फोडींना लागेल. फोडी थंड झाल्यावर त्यात दही घालावे व कालवावे.

गरम गरम जेवणाबरोबर सर्व करा.


पोहे ( प्रकार दुसरा )

साहित्य 

२ वाट्या पातळ पोहे,

अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर,
पाव वाटी किसलेले ओले खोबरे,
पाव वाटी शेंगदाणे,

१ मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा,
१ मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो,

२ हिरव्या मिरच्या,

२ टेबल स्पून लिंबाचा रस,
२ टी स्पून आले किसून,
२ टी स्पून तेल,
३ ते ४ कडीपत्ता पाने,
१ टी स्पून हळद,
अर्धा टी स्पून मोहरी.

कृती 

पोह्यात पाणी घालून ते भिजवून लगेच त्यातील पाणी निथळून घ्या.पाण्याचा अंश काढून टाका.
एका पॅन मध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, हळद आणि कडीपत्ता पाने टाकून फोडणी करून घ्या.
आता बारीक केलेली मिरची व शेंगदाणे फोडणीत घाला. मिनिटभर मंद आचेवर मिश्रण हलवा व शेंगदाण्याना फोडणी लागू द्या. 
        आता हि फोडणी पोह्यांवर टाका व पोहे व्यवस्थित हलवून मिश्रण एकजीव करा. नंतर त्यात किसलेले ओले खोबरे, आले, चिरलेला टोमॅटो व कांदा टाका. मिश्रण पुन्हा हलवून एकजीव करा. आता त्यात चिरलेली कोथिंबीर व चवीपुरते मीठ टाका. शेवटी लिंबाचा रस घालून मिश्रण हलवून एकजीव करा.

सकाळच्या नाश्त्याला सर्व करा.

पोहे

साहित्य 

२ वाट्या पोहे,
१ मध्यम बटाटा बारीक काप करून,
१ मध्यम कांदा बारीक काप करून,
१ टेबल स्पून बारीक चिरलेली कोथिंबीर,
२ टेबल स्पून तेल,
अर्धा टी स्पून हळद,
अर्धा टी स्पून मोहरी,
१ टेबल स्पून लिंबाचा रस,
पाव वाटी कच्चे शेंगदाणे,
मीठ चवीला.
२ कप पाणी.

कृती 

पोहे पाण्यात भिजवून त्यातील पाणी निथळून टाका. 
एका खोलगट पॅन मध्ये तेल गरम करा. त्यात मोहरी, बारीक केलेला कांदा व बटाटा आणि शेंगदाणे टाका.
थोडा पाण्याचा शिडकावा मारून झाकण लावून मंद आचेवर शेंगदाणे व बटाटे मऊ होईपर्यंत ठेवा.
       पोह्यातले सर्व पाणी काढून टाका व त्यात हळद टाका व मिश्रण हलवा जेणेकरून पोह्याला पिवळसर रंग येईल. आता वरील मिश्रणात पोहे टाका. चवीला मीठ टाका. मिनिटभर मंद आचेवर पोहे परता.

त्यावर कोथिंबीर व लिंबाचा रस टाकून गरम गरम सर्व करा.

कारल्याचे काप ( प्रकार दुसरा )

साहित्य 

४ ते ५ कारली,
२ टी स्पून हळद,
१ टी स्पून लाल तिखट,
२ टेबल स्पून लिंबाचा रस,
अर्धी वाटी तांदूळ पीठ,
पाव वाटी बेसन,
तेल,
साखर आवडीनुसार,
मीठ अंदाजे.

कृती 

कारली स्वच्छ धुवून त्यांचे गोल काप करून घ्यावेत, त्यातील बिया काढून टाकाव्यात. त्यांना हळद, मीठ, लिंबाचा रस लावून ते अर्धा तास ठेवावेत.
       तांदूळ पिठात, लाल तिखट, अंदाजे मीठ व थोडे तेल घालावे चवीस बेसन पीठ घालावे. तांदूळ व बेसन पीठ प्रमाण २:१ असावे. आता या मिश्रणात अंदाजे पाणी घालून पातळसर पीठ भिजवावे. 
       आता नॉन-स्टिक पॅनला तेल लावून तो गरम करावा. कारल्याचे काप वरील पिठात व्यवस्थित बुडवून तव्यावर मांडावेत. वरून बाजूने थोडे तेल सोडावे. खालील बाजू तांबूस  झाली कि दुसऱ्या बाजूने खरपूस भाजून घ्यावेत.

पुदिन्याच्या किंवा खोबऱ्याच्या चटणीबरोबर गरम गरम काप सर्व करावेत.

कारल्याचे काप

साहित्य 

४ ते ५ कारली,
२ टी स्पून हळद,
२ टेबल स्पून लिंबाचा रस,
१ टी स्पून मोहरी,
अर्धा टी स्पून हिंग,
अर्धी वाटी दही,
२ टी स्पून लाल तिखट,
१ टेबल स्पून बारीक चिरलेली कोथिंबीर,
साखर आवडीनुसार,
मीठ अंदाजे,

कृती

कारली स्वच्छ धुवून त्यांचे गोल काप करून घ्यावेत, त्यांच्यातील बिया काढून टाकाव्या. त्यांना हळद, मीठ व लिंबाचा रस लावून अर्धा तास ठेवावे. 
      एका पॅन मध्ये तेल गरम करून मोहरी, हिंग आणि हळद घालून फोडणी करावी. त्यात कारल्याचे काप घालून ते तांबूस होईपर्यंत परतून घ्यावेत. आता त्यात लाल तिखट, दही व चवीला साखर घालून मिश्रण एकजीव करावे. अर्धा मिनिटभर पॅन झाकण लावून ठेवावे जेणेकरून वाफ येऊन कारली मऊ होतील.नंतर त्यावर कोथिंबीर पसरावी.

रोटी किंवा चपाती बरोबर कारल्याची भाजी सर्व करावी.

कोथिंबीरीची भाजी

साहित्य 

१ मोठी जुडी कोथिंबीर,
अर्धा टेबल स्पून बेसन,
अर्धा टेबल स्पून तांदूळ पीठ,
अर्धा टी स्पून ओवा,
अर्धा टी स्पून हिंग,
अर्धा टी स्पून मोहरी,
अर्धा टी स्पून हळद,
साखर चवीनुसार,
लाल तिखट ( आवडीप्रमाणे )
मीठ अंदाजे,
तेल अंदाजे,

कृती 

कोथिंबीरीची पाने स्वच्छ धुवून कागदावर पसरून कोरडी करावी. एका पातेल्यात हि कोथिंबीर घेऊन त्यात बेसन व तांदूळ पीठ घालावे. चवीस साखर व मीठ घालावे. आवडत असल्यास लाल तिखट घालावे. हे मिश्रण हलवून एकजीव करावे. 
        एका खोलगट पॅन मध्ये तेल गरम करून त्यात हळद. मोहरी आणि हिंग घालून फोडणी करावी त्यात ओवा घाला. आता या पॅन मध्ये कोथिंबीर घाला हलक्या हाताने खालीवर परता. आता पॅनवर झाकण लावून 
अर्धा मिनिटभर मंद आचेवर ठेवा.

रोटी किंवा चपाती बरोबर वाढा.


Monday 22 July 2013

मेथीची भाजी

साहित्य 

१ जुडी मेथी,
१ टेबल स्पून लाल तिखट,
अर्धा टी स्पून हिंग,
अर्धा टी स्पून हळद,
एक टी स्पून मोहरी,
२ टेबल स्पून बेसन पीठ,
बारीक केलीली कोथिंबीर अंदाजे,
साखर चवीला,
मीठ अंदाजे.

कृती 

मेथीची पाने निवडून धुवून कोरडी करावीत. एका खोलगट पातेल्यात लाल तिखट, मीठ, बेसनपीठ 
( आवडीनुसार ), चवीला साखर व मीठ घाला. थोडी बारीक केलेली कोथिंबीर घाला. हलवून मिश्रण एकजीव करा.
      एका खोलगट पॅन मध्ये तेल गरम करून  हिंग, मोहरी, हळद, घालून फोडणी तयार करा. त्यात वरील मेथीचे मिश्रण घाला. चटकन परता व खाली उतरून घ्या. झाकण लावून मिनिटभर ठेवा आत वाफ आपोआप तयार होईल.

गरम गरम रोटी किंवा चपाती बरोबर सर्व करा.

नारळाची चटणी

साहित्य 

२ वाट्या नारळ चव ( खोवलेला नारळ ),
१ टी स्पून आले पेस्ट,
अर्धा टी स्पून हिंग,
२ हिरव्या मिरच्या,
३ ते ४ कडीपत्ता पाने,
१ टी स्पून जिरे,
१ टी स्पून लिंबाचा रस,
२ टेबल स्पून बारीक चिरलेली कोथिंबीर,
तेल आवश्यकतेनुसार,
साखर आवडीनुसार,
मीठ चवीला,

कृती 

आले पेस्ट लिंबाच्या रसात घाला त्यात साखर व मीठ घालून मिश्रण एकजीव करा. नारळाच्या चवात वरील सर्व मिश्रण घालून एकजीव करा. त्यात कोथिंबीर घाला.
        मिरची बारीक वाटून घ्या. एका पॅन मध्ये गरम तेलात जिरे, हिंग, हळद, व मिरची पेस्ट आणि कडीपत्ता यांची फोडणी तयार करा. हा तडका चटणीस द्या. चटणी व्यवस्थित हलवून एकजीव करा.

चपाती किंवा रोटी बरोबर सर्व करा.



मेतकुट

साहित्य 

२ वाटी चणाडाळ,
१ वाटी तांदूळ,
१ वाटी उडीद डाळ,
१ टेबल स्पून जिरे,
२ टी स्पून मेथी दाणे,
२ टी स्पून हिंग,
२ टी स्पून मोहरी,
२ टी स्पून हळद,
२ टेबल स्पून धने,
लाल तिखट आवडीनुसार.

कृती 

उडीदडाळ खरपूस भाजून घ्या. चणाडाळ, तांदूळ पण एक एक करून खरपूस भाजून घ्या. गरम कढईत धने, जिरे, मेथी, हिंग, हळद, मोहरी, तिखट किंचित परतवून घ्या. हे सर्व पदार्थ एकत्र करून मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्या. चवीला मीठ घाला. तिखट आवडीनुसर वापरा.

पालक भाजी

साहित्य 

अर्धी वाटी मुगडाळ,
एक जुडी पालक,
अर्धा टी स्पून हिंग,
अर्धा टी स्पून हळद,
एक टी स्पून मोहरी,
३ ते ४ कडीपत्ता पाने,
एक टी स्पून जिरे,
एक टी सून आले पेस्ट,
एक टी स्पून लसून पेस्ट,
पाव वाटी बारीक केलेले ओले खोबरे,
हिरवी मिरीची आवडीनुसार,
कोथिंबीर आवडीनुसार,
गुळ अंदाजे,
मीठ अंदाजे,

कृती 

मुगडाळ थोडावेळ भिजवावी ( अर्धा तास ). पालक बारीक चिरून त्यात मुगडाळ घालावी व मिश्रण कुकरला लावावे. ४ ते ५ शिट्या काढून घ्याव्यात. नंतर हे मिश्रण चांगले घोटावे.
       आता एका पॅन मध्ये थोड्या तेलात मोहरी, हिंग, हळद आणि कडीपत्ता यांची फोडणी करावी. हि फोडणी पालकाच्या मिश्रणावर ओतावी.
        आता जिरे, ओले खोबरे, कोथिंबीर, आले पेस्ट, लसून पेस्ट आणि मिरची यांची मिक्सर मध्ये वाटून बारीक पेस्ट करावी. हो पेस्ट पालक मिश्रणात घालावी. चवीस गुळ व मीठ घालावे. मिश्रण एकजीव करावे.
        मंद आचेवर एक उकळी काढावी.

गरम गरम पालक भाजी, रोटी किंवा भाकरी बरोबर सर्व करावी.

Friday 19 July 2013

कोवळ्या कणसांचा मसाला भात

साहित्य 

१ कप बासमती तांदूळ,
१ कप कोवळी कणसे ( बेबी कॉर्न ),
१ कप हिरवे वाटाणे,
अर्धा टी स्पून जिरे,
अर्धा टी स्पून मोहरी,
१ टेबल स्पून लिंबाचा रस,
२ टेबल स्पून तेल किंवा तूप,
१ टी स्पून साखर,
१२ ते १५ काजू तुकडे केलेले.
कोथिंबीर आवश्यकतेनुसार,
मीठ चवीनुसार.

मसाला 

१ टी स्पून लाल तिखट पावडर,
१ टी स्पून सांबार मसाला,
अर्धा टी स्पून गरम मसाला,
पाव टी स्पून हळद,

कृती 

एका खोलगट पॅन मध्ये तूप गरम करा. त्यात काजू घालून मध्यम आचेवर भाजून घ्या. काजू बाजूला काढून ठेवा. आता जिरे, मोहरी त्याच पॅनमध्ये टाकून भाजून घ्या. मोहरी तडतडू द्या. 
      आता त्यात कणसे, हिरवे वाटाणे आणि सर्व मसाले टाका व एक मिनिटभर मिश्रण भाजा. सारखे हलवत राहा. आता त्यात तांदूळ व आवश्यक तेवढे पाणी टाका आणि मिश्रण ढवळून एकजीव करा. मंद आचेवर भात शिजू द्या.
      भातात थोडे पाणी असताना त्यात कोथिंबीर, काजू व लिंबाचा रस टाका आणि मिश्रण एकजीव करा. झाकण लावून भात मंद आचेवर शिजू द्या.

गरम गरम भात लोणच्याबरोबर सर्व करा.
   

शिरा ( नेहमीचा )

साहित्य 

१ कप रवा,
पाव कप साखर,
अर्धा कप तूप,
३ कप पाणी,
अर्धा टी स्पून वेलची पावडर,
काजू, बदाम यांचे तुकडे.

कृती 

एका पॅन मध्ये तूप गरम करा. त्यात रवा टाकून मंद आचेवर सारखे चमच्याने हलवत राहा. रवा हलका तांबूस होईपर्यंत भाजून घ्या.
      एका भांड्यात पाणी, साखर आणि वेलची पावडर एकत्र करून एक उकळी काढा. मंद आचेवर १ ते २ मिनिटे ठेवा. सारखे ढवळत राहा. 
      आता रवा आणि वरील मिश्रण एकत्र करा व एक उकळी काढा. लगेच गॅस कमी करून मंद आचेवर रवा शिजू द्या. दर मिनिटाला शिरा ढवळत राहा. त्यातले पाणी आटल कि भांडे खाली उतरा.
      त्यावर काजू, बदाम यांचे तुकडे पसरून गरम गरम सर्व करा.


कर्ड राईस

साहित्य 

३ वाट्या बासमती तांदूळ,
४ वाट्या दही,
दीड वाटी दुध,
३ ते ४ कडीपत्ता पाने,
अर्धा टी स्पून हिंग पावडर,
१ टेबल स्पून मोहरी,
२ ते ३ हिरव्या मिरच्या,
१ टी स्पून आले पेस्ट,
३ टेबल स्पून तेल,
मीठ चवीनुसार.

कृती

एका भांड्यात तांदूळ व पुरेसे पाणी घालून मंद आचेवर एक उकळी काढून घ्या. आता चवीनुसार मीठ घालून भात मंद आचेवर शिजवा. आता भात थंड करून त्यात दही व्यवस्थित एकजीव करा. त्यात उकळून गार केलेले दुध घाला. आता आले पेस्ट आणि बारीक केलेली मिरची त्यात घाला.
     एका पॅन मध्ये तेल गरम करून मोहरी, कडीपत्ता पाने आणि हिंग मंद आचेवर मिनिटभर भाजून घ्या.
पॅन खाली उतरवून त्यात आता भात आणि दह्याचे मिश्रण टाका आणि एकजीव करा.

खोबऱ्याच्या चटणीबरोबर किंवा लोणच्याबरोबर सर्व करा.

शिरा

साहित्य 

एक वाटी रवा,
पाऊण वाटी मुग डाळ रवा,
२ ते ३ वाटी गुळ,
अर्धी वाटी तूप,
४ वाट्या पाणी.

कृती 

मुग डाळ खरपूस भाजून त्याचा नेहमीच्या रव्यासारखा रवा तयार करून घ्या. भांड्यात रवा घालून मंद आचेवर बदामी रंग येईपर्यंत  भाजून घ्या. मुग डाळ रवा ही अश्याच प्रकारे भाजून घ्या. एका भांड्यात गुळ व पाणी एकत्र करून उकळत ठेवा. गुळ व पाणी एकजीव झाल्यानंतर ते या रव्यात मिसळा. झाकण लावून रवा शिजेपर्यंत मंद आचेवर ठेवा. गुळाऐवजी साखर वापरली तरी चालेल.

Wednesday 17 July 2013

कोल्ड कॉफी

साहित्य 

५ कप दुध ( व्होल मिल्क ),
अर्धा कप गरम पाणी,
६ टी स्पून कॉफी पावडर,
३ टेबल स्पून बारीक साखर,
दुधाची साय आवडीप्रमाणे,
बारीक केलेला बर्फ.

कृती 

कॉफी पावडर आणि साखर गरम पाण्यात टाकून विरघळण्यासाठी व थंड करण्यासाठी ठेऊन द्या.
आता वरील थंड झालेले मिश्रण आणि थंड दुध एका भांड्यात ब्लेंडर ने एकजीव करून घ्या. आता थोडीशी साय व बारीक केलेला बर्फ टाकून पुन्हा ब्लेंडरने एकजीव करून घ्या. थोडासा फेस आल्यानंतर ग्लास मध्ये ओतून सर्व करा.

मुगाचे धिरडे

साहित्य 

एक वाटी मोड आलेले मुग,
३ ते ४ हिरव्या मिरच्या,
१ टी स्पून जिरे,
मीठ अंदाजे,
लसूण आवडीनुसार.

कृती

मुग, हिरव्या मिरच्या व जिरे मिक्सर मध्ये वाटून घ्या. त्यात आवडीनुसार बारीक केलेला लसूण आणि चवीला मीठ घाला. मिश्रणात थोडे पाणी घालून ते पातळ बनवा व पुन्हा मिक्सर मध्ये फिरवून घ्या.
     गरम तव्यावर थोडे तेल टाकून वरील मिश्रणाचा एक पातळ थर ओता ( धिरडे बनवा ). मंद आचेवर दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्या.

चटणीबरोबर गरम गरम सर्व करा.

आलू पालक

साहित्य

३ कप बारीक केलेला पालक,
२ मध्यम आकाराचे बटाटे,
२ मध्यम आकाराचे कांदे,
१ मध्यम टोमॅटो,
१ टी स्पून लिंबू रस,
१ टी स्पून आले पेस्ट,
२ हिरव्या मिरच्या,
अर्धा टी स्पून गव्हाचे पीठ,
१ टी स्पून लाल मिरची पावडर,
अर्धा टी स्पून जिरे,
अर्धा टेबल स्पून लोणी,
४ टेबल स्पून तूप,
मीठ चवीला.

मसाला

अर्धा टी स्पून लवंग पावडर,
अर्धा टी स्पून दालचिनी पावडर,
पाव टी स्पून हळद,
पाव टी स्पून हिंग पावडर,
अर्धा टी स्पून गरम मसाला,

कृती

पालक धुवून एका पॅन मध्ये घ्या, त्यावर थोडे पाणी शिंपडून व मीठ घालून त्याला एक मिनिटात मोठ्या आचेवर झाकण लावून एक उकळी काढून घ्या किंवा एका भांड्यात पाणी उकळून घ्या व त्यात पालक २ मिनिटे बुडवून ठेवा त्यात थोडे मीठ घाला. त्यानंतर पालक लगेच गार पाण्याच्या धारेखाली धरून थंड करा. किंवा एका चाळणीत घेऊन त्यावर गार पाणी ओता. आता पालक व मिरच्या मिक्सर मध्ये घालून बारीक करा. पालकाची पेस्ट होणार नाही याची काळजी घ्या.
      बटाट्यांना उकडून, साले काढून त्यांचे मध्यम आकाराचे तुकडे करून घ्या. तूप एका खोलगट पॅन मध्ये गरम करून त्यात बटाटे हलका तांबूस रंग येई पर्यंत भाजून घ्या. बटाटे बाजूला काढून ठेवा.
     कांदा बारीक चिरून घ्या. त्याच पॅन मध्ये जिरे, आले, कांदा टाकून, कांद्याचा रंग गुलाबी होई पर्यंत भाजून घ्या. टोमॅटो किसून तो पॅनमध्ये टाका व पुन्हा २ मिनिटांसाठी मिश्रण भाजून घ्या. आता सर्व मसाले त्यात टाकून मंद आचेवर भाजून घ्या. मिश्रण सारखे हलवत राहा. मिश्रणातले तूप वेगळे होईल एवढा वेळ आचेवर ठेवा.
      आता बटाटे आणि पालक त्यात टाका आणि एक उकळी काढा. उकळी आल्यानंतर त्यात गव्हाचे पीठ पसरवून टाका. २ ते ३ मिनिटांसाठी आचेवर ठेवा. आता लिंबाचा रस त्यात टाका.
       सर्व करताना एका पॅनमध्ये लोणी गरम करा व त्यात हिंग पावडर टाकून ते मिश्रण भाजीवर ओता व हलक्या हाताने चमच्याने एकजीव करा.
       तंदुरी रोटी बरोबर किंवा नान बरोबर गरम गरम सर्व करा.


Tuesday 16 July 2013

मेक्सिकन भात

साहित्य 

एक वाटी बासमती तांदूळ,
एक कांदा पात जुडी,कोबी,
२ मध्यम शिमला मिरची,
एक मोठा टोमॅटो,
१ टेबल स्पून टोमॅटो सॉस,
१ टी स्पून सोय सॉस,
१ टी स्पून लाल तिखट,
मीठ अंदाजे,
तेल अंदाजे,
साखर आवडीप्रमाणे,

कृती 

    तांदूळ शिजवून घ्या, तांदळाचा प्रत्येक दाणा वेगळा होईल एवढा वेळच शिजवा.
थंड होण्यास बाजूला ठेवा.
    एका पॅन मध्ये तेल गरम करा, त्यात शिमला मिरचीचे बारीक तुकडे करून टाका. शिमला मिरची मऊ व उजळ होईपर्यंत भाजा आणि  बाजूला काढून ठेवा. आता कांदा पात सुद्धा बारीक चिरून वरील प्रमाणे भाजून घ्या व वेगळी काढून ठेवा. कोबी सुद्धा बारीक चिरून (अर्धी वाटी इतका ) वरील प्रमाणे भाजून घ्या व वेगळा काढून घ्या. ( आवश्यक असल्यास अजून थोडे तेल टाका ).
    आता बारीक चिरलेला टोमॅटो,लाल तिखट, साखर, मीठ आणि सर्व सॉसेस एकत्र पॅन मध्ये टाका. एक मिनिटभर मिश्रण भाजा व हलवत राहा. आता त्यात सर्व भाज्या टाका व मिश्रण हलवत राहा. मिनिटभर मंद आचेवर ठेवा.
    आता ओवन मध्ये ठेवण्याच्या भांड्यात भात व या भाज्या हलक्या हाताने एकजीव करा.  भांडे फोइल ने बंद करून गरम ओवन मध्ये १० ते १२ मिनिटांसाठी ठेवा.

गरमा गरम सर्व करा.


नारळी भात

साहित्य 

अडीच वाटी बासमती तांदूळ,
४ ते ५ कप नारळाचे दुध,
२ मध्यम आकाराचे कांदे,
७ ते ८ कडीपत्ता पाने,
३ ते ४ टी स्पून हळद,
२ टेबल स्पून तूप,
काजू आवडीप्रमाणे,
मीठ अंदाजे.

मसाले 

अर्धा इंच दालचिनी,
६ लवंग, ५ वेलची ठेचलेली,
७ ते ८ काळी मिरी,

कृती 

तांदूळ स्वच्छ धुवून एका भांड्यात अर्ध्या तासासाठी ठेवून द्या.
      एका पॅन मध्ये तूप गरम करा त्यात कांदे बारीक चिरून टाका, त्यात सर्व मसाले टाका, कडीपत्ता, थोडे काजू  ( आवडीनुसार ) टाका. कांदे सोनेरी, तांबूस होईपर्यंत भाजा. मिश्रण सारखे चमच्याने हलवत राहा.
आता त्यात हळद व तांदूळ टाका आणि मिश्रण एकजीव करा, ३ ते ४ मिनिट मंद आचेवर ठेवा सारखे चमच्याने हलवत राहा जेणेकरून तूप तांदळाला लागेल.
      आता त्यात नारळाचे दुध आणि चवीला मीठ घाला. मिश्रण ढवळून एकजीव करा व एक उकळी काढा.
पॅनला घट्ट झाकण बसवून मंद आचेवर अंदाजे २५ मिनिटे भात शिजवा. नारळाचे दुध भातात शोषले जाईल.

बारीक चिरलेली कोथिंबीर पसरवून आमटी किंवा सांबार बरोबर गरम गरम सर्व करा.



अळू वडी

साहित्य 

६ ते ७ अळूची पाने,
दीड वाटी डाळीचे पीठ,
अर्धा टी स्पून हळद,
एक टी स्पून खसखस,
एक टेबल स्पून गुळ,
पाव वाटी चिंचेचा कोळ,
एक टी स्पून आले,
एक टी स्पून लसूण,
अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर,
एक टी स्पून जिरे,
४ ते ५ हिरव्या मिरच्या,
मीठ अंदाजे.

कृती 

     प्रथम अळूची पाने स्वच्छ धुवून घ्या. ( काळजी घ्या घश्यात खवखव न करणाऱ्या अळूची पाने निवडा )
आले, लसूण, हळद, खसखस आणि चिंचेचा कोळ मिक्सर मध्ये फिरवून एकजीव करा आता त्यात बारीक केलेला गुळ घालून पुन्हा एकदा मिक्सर मध्ये मिश्रण एकजीव करून घ्या. हे मिश्रण डाळीच्या पिठात घालून एकजीव करा. चवीपुरते मीठ घाला.आता त्यात पाणी घालून मिश्रण भज्याच्या पिठासारखे सरसरीत भिजवून घ्या.
    आता पाटावर एक अळूचे पान पसरवून त्यावर हे पीठ हाताने लावा. एक पातळ थर पिठाचा लावून घ्या.
पीठ सर्व पानावर पसरले आहे याची काळजी घ्या. थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर त्यावर पसरा.त्यावर आता दुसरे पान ठेवा व पुन्हा वरील प्रमाणे पिठाचा एक थर लावून कोथिंबीर पसरा . अशी तीन ते चार पाने लावा. आता त्या पानांची गुंडाळी करून दोन्ही कडा पीठाने व्यवस्थित बंद करा. अश्या प्रकारे सर्व पानांच्या सुरळ्या करून घ्या.
     आता कुकरमध्ये भांड्यात ठेवून सुरळ्या वाफवून घ्या. किंवा पाणी असलेल्या भांड्यावर चाळण ठेऊन त्यात वाफवून घ्या. वाफावल्यानंतर त्यांचे सुरीने व्यवस्थित तुकडे करा. एका वडीत सुरी खुपसून सुरीला पीठ लागतंय का ते पहा. लागत नसेल तर त्या तयार आहेत.
     आता पॅन मध्ये तेल गरम करून ह्या वड्या भाजून घ्या किंवा त्यांना नेहमीची फोडणी द्या.

गरम गरम वड्या जेवताना सर्व करा.


पालक भजी

साहित्य

पालकाची पाने,
१ वाटी चणा डाळीचे पीठ,
पाव टी स्पून हळद,
अर्धा टी स्पून  ओवा,
अर्धा टी स्पून जिरे,
तिखट अंदाजे,
मीठ चवीपुरते,
तेल.

कृती

डाळीच्या पिठामध्ये हळद, ओवा, जिरे, तिखट ( आवडीप्रमाणे ) व मीठ घालून मिश्रण एकजीव करा.
आता त्यात पाणी घालून भज्याच्या पिठासारखे भिजवा.
पालकाची पाने स्वच्छ धुवून घ्या. आता भिजवलेल्या पिठात एक एक पान व्यवस्थित बुडवून गरम तेलात 
सोडा. मंद आचेवर अश्या प्रकारे पाने तळून घ्या. गरम गरम भजी सॉस किंवा चटणी बरोबर सर्व करा.


Monday 15 July 2013

मसाला भात

साहित्य 

३ कप बासमती तांदूळ,
३ टेबल स्पून तूप,
३ टेबल स्पून तेल,
३ मोठे कांदे,
अर्धा टी स्पून हळद,
३ हिरव्या मिरच्या,
२ कडीपत्ता पाने,
अर्धा कप शेंगदाणे / काजू मधून वेगळे केलेले,
५ कप गरम पाणी,
३ टी स्पून मीठ.

मसाले

२ टी स्पून काळी मोहरी,
२ अर्धा इंच दालचिनी,
५ वेलची, ६ लवंगा ठेचून, २० काळे मिरे,


कृती 

      तांदूळ स्वच्छ धुवून सुकण्यासाठी अर्धा तास एका भांड्यात ठेऊन द्या. कांद्याचे  बारीक निमुळते तुकडे
करून घ्या. एका खोलगट पॅन मध्ये निम्मे तूप आणि तेल गरम करा त्यात कांदे आणि सर्व मसाले व्यवस्थित भाजून घ्या. मिश्रण सारखे हलवत राहा. कांदे सोनेरी, तांबूस होई पर्यंत पॅन मध्ये भाजा.त्यातील निम्मे मिश्रण बाजूला काढून ठेवा. 
       आता हळद आणि तांदूळ पॅन मध्ये घाला. सारखे चमच्याने मिश्रण हलवत राहा जेणेकरून तूप तांदळाना व्यवस्थित लागेल. आता त्यात मीठ व गरम पाणी घाला आणि मिश्रण ढवळून एकजीव करा. एक उकळी काढा.
आता एक घट्ट झाकण लावून मंद आचेवर २० ते २५ मिनिटे शिजवून घ्या.
       उरलेले तेल आणि तूप एका पॅन मध्ये गरम करा आणि त्यात काजू किंवा शेंगदाणे सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या.ते बाजूला काढून घ्या. आता कडीपत्ता पाने, हिरव्या मिरच्या आणि मोहरी त्याच पॅन मध्ये भाजून घ्या.
मोहरी तडतडू द्या. हे मिश्रण भातावर ओता व चमच्याने हलक्या हातानी एकजीव करा.
        डिश मध्ये भातावर भाजलेला कांदा पसरवा, त्यावर भाजलेले शेंगदाणे किंवा काजू पसरवा 
वरून बारीक केलेली कोथिंबीर मधून मधून पेरून गरम गरम सर्व करा.


मुगाची खिचडी

साहित्य 

दीड वाटी तांदूळ,
पाउण वाटी मुग डाळ,
एक मोठा टोमॅटो,
४ अखंड हिरव्या मिरच्या,
अर्धा टी स्पून हिंग पावडर,
अर्धा टी स्पून हळद,
४ टेबल स्पून धने पावडर,
२ टेबल स्पून जिरे पावडर,
१/४ टी स्पून दालचिनी पावडर ,
अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर,
अर्धी वाटी भिजवलेले शेंगदाणे,
१ लिंबू, ओल्या खोबरयाचा कीस अंदाजे.
४ टेबल स्पून तूप,
तेल अंदाजे, मीठ अंदाजे,
साखर चवीनुसार


कृती 

डाळ व तांदूळ धुवून, निथळून बाजूला ठेवून द्यावे.
कढइत ८ टेबल स्पून तेल गरम करा ( तेल आवडीप्रमाणे ).
त्यात टोमॅटोचे उभे काप, अखंड मिरच्या घालून परतावे.
हिंग, हळद घालावे व २ कप पाणी घालून उकळी काढावी.
धने, जिरे, दालचिनी यांची पूड एकत्र करून मिश्रणात घालावी
आता डाळ,तांदूळ व भिजवलेले शेंगदाणे  त्यात घालावे. 
तूप घालून मिश्रण ढवळून एकजीव करून कुकर मध्ये लावावे 
किंवा जाड बुडाच्या भांड्यात शिजण्यास ठेवावे. 
आवश्यक वाटल्यास पुन्हा थोडे कढत पाणी घालावे. 
घट्ट झाकण लावून मंद आचेवर शिजवावे. तांदूळ शिजल्यावर 
खाली काढून त्यावर खोबरयाचा कीस व बारीक चिरलेली कोथिंबीर पसरावी 

गरम गरम खिचडी सर्व करावी.

शाकाहारी ऑम्लेट

साहित्य 

१ वाटी बेसन पीठ,
१ वाटी तांदूळ पीठ,
१ वाटी ज्वारी पीठ,
४ ते ५ टेबल स्पून बारीक रवा,
१ वाटी किसलेला कोबी,
अर्धी वाटी बारीक चिरलेला पालक,
अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर,
२ टी स्पून बारीक चिरलेली हिरवी मिरीची ( आवडीनुसार ),
१ टेबल स्पून जिरे,
२ टेबल स्पून दही,
मीठ अंदाजे,
साखर चवीला.

कृती 

वरील सर्व साहित्य पाणी घालून भज्याच्या पिठाप्रमाणे सरसरीत भिजवा.
तापलेल्या तव्यावर तेल सोडून त्यावर पळीभर पीठ पसरवा व झाकण टाकून थोडावेळ ठेवा 
एकाच बाजूने भाजा.

गरम गरम ऑम्लेट सॉस बरोबर वाढा.


तांदळाचे थालीपीठ

साहित्य 

१ वाटी तांदूळ पीठ,
१ पळी शिजलेली घट्ट तुरडाळ,
१ मध्यम आकाराच्या बटाट्याचा कीस,
१ मध्यम आकाराच्या कांद्याचा कीस,
अर्धा टी स्पून ओवा,
अर्धा टी स्पून हिंग पावडर,
अर्धा टी स्पून हळद पावडर,
१ टेबल स्पून बारीक कापलेली हिरवी मिरची किंवा मिरची पूड,
१ टेबल स्पून बारीक कापलेली कोथिंबीर,
मीठ अंदाजे,
तेल अंदाजे,
साखर चवीनुसार

कृती 

तांदूळ पीठ, बटाट्याचा कीस, कांद्याचा कीस, ओवा, हिंग पावडर, हळद, मीठ, 
साखर, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालून मिश्रण एकजीव करावे.
त्यात २ टेबल स्पून तेल गरम करून घालावे व पीठ मळावे.
पाणी आवश्यक असल्यास वापरावे. कणिक मुरण्यासाठी १५ मिनिटे ठेवून द्यावी.
आता पोळपाटावर तांदूळपिठाचा वापर करून थालीपीठ लाटावे . त्यास भोके पाडावीत.
गरम तव्यावर तेल सोडून त्यावर थालीपीठ टाकावे.भोकांमध्ये व कडेने थोडे थोडे तेल सोडावे.
दोन्ही बाजूनी लालसर होई पर्यंत भाजून घ्यावे. झाकण घालू नये.

गरम गरम थालीपीठ लोण्याबरोबर वाढावे किंवा नुसते हि चविष्ट लागते.

मुगाचे कळन

साहित्य 

२ वाटी मुग, 
अर्धी वाटी नारळाचे दुध,
अर्धी वाटी ताक,
आले अंदाजे,
हिरवी मिरची अंदाजे,
१ टी स्पून जिरे,
साखर चवीसाठी

कृती 

पहिल्यांदा मुग खमंग भाजून घ्यावेत. छान वास येईपर्यंत 
जास्त पाणी घालून कुकरमध्ये मऊसर शिजवून घ्यावेत.
नंतर त्यातील पाणी वेगळे काढून घ्यावे. त्यात नारळाचे दुध, ताक व बारीक 
केलेली कोथिंबीर घालावी.
आले, हिरवी मिरची आणि जिरे यांची पेस्ट करून ती त्यामध्ये घालावी.
मंद आचेवर गरम करावे. ताक फुटू नये म्हणून सारखे ढवळावे ( उकळू नये ).
थोडीशी चवीला साखर घालावी.

गरम गरम भाताबरोबर खाण्यासाठी वाढावे.


कोथिंबीरीच्या वडया

साहित्य 

एक मध्यम आकाराची कोथिंबीरीची जुडी,
एक वाटी हरभरा डाळ,
हिरवी मिरची अंदाजे,
अर्धा टी स्पून धने पावडर,
अर्धा टी स्पून जिरे पावडर,
अर्धा टी स्पून ओवा,
मीठ अंदाजे

कृती 

हरभरा डाळ भिजवून थोडावेळ ठेवा. डाळ व्यवस्थित भिजल्या नंतर ती मिक्सर मध्ये वाटून घ्या 
डाळ एकदम  बारीक होणार नाही याची काळजी घ्या. हिरवी मिरची हि वाटून घ्या.
आता धने पावडर, जिरे पावडर, ओवा, वाटलेली मिरची  अन डाळ एकत्र करा 
त्यात कोथिंबीर धुवून बारीक चिरून घाला. थोडे पाणी अन अंदाजे मीठ घालून एकजीव करा 
कणकेप्रमाणे मिश्रण घट्ट मळून घ्या. थोडावेळ कणिक मुरु द्या.
आता एका कुकरच्या डब्याला आतून तेल लावून घ्या व त्यात त्या कणकेच्या गोल सुरळ्या करून ठेवा
कुकरला एक शिटी काढून त्या वाफवून घ्या.
एका वडी मध्ये सुरी खुपसून पहा सुरीला जर पीठ लागल नाही तर त्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत 
कुकर ऐवजी हि कृती भांड्यात सुद्धा करता येते. भांड्यावर चाळण  ठेऊन त्यात सुरळ्या ठेवून झाकण घालून वाफवून घ्या व सुरीने त्या शिजल्या आहेत का ते पहा ( वरील प्रमाणे ).
सुरळ्या थंड करून त्यांचे काप करा व तेलामध्ये तळून घ्या किंवा त्यांना नेहमीची फोडणी द्या.

गरम गरम जेवताना वाढा

मिश्र भाज्यांचा भात

साहित्य 

२ कप बासमती तांदूळ, 
२ कप भाज्या खालील प्रमाणे 
बटाटे, कांदे, गाजर, फ्लोवर,
दोडके, फरस बी, दुधी, शिमला मिरची,
२ टेबल स्पून दही,
एक टोमॅटो, २ टेबल स्पून तूप,
अर्धा टी स्पून दालचिनी पावडर ,
अर्धा टी स्पून लवंग पावडर,
अर्धा टी स्पून हळद पावडर,
अर्धा टी स्पून धने पावडर,
अर्धा टी स्पून आले-लसूण पेस्ट
मीठ अंदाजे 
लिंबाचा रस अंदाजे
प्रत्येकी अर्धा टी स्पून जिरे आणि मोहरी 

कृती 

 तांदूळ धुवून उकडून घ्या, तांदळाचा प्रत्येक दाणा वेगळा होईल एवढा वेळच तांदूळ उकडा.
एका पसरट प्लेट मध्ये थंड करण्यास काढून ठेवा. 
एका पॅन मध्ये मध्यम आचेवर तूप गरम करा. लवंग,दालचिनी, जिरे, मोहरी आणि आले-लसून पेस्ट त्यात घालून एक मिनिटभर ठेवा. चमच्याने ढवळत रहा.सर्व भाज्या बारीक निमुळते तुकडे करून त्यात मिसळा, टोमाटो बारीक तुकडे करून घाला. उरलेले मसाले व दही घाला व मिश्रण एकजीव होईपर्यंत ढवळा.
झाकण घालून  भाज्या मऊ होईपर्यंत मध्यम आचेवर शिजवा.
ओवन मध्ये ठेवण्यासाठी असलेल्या भांड्यात थोड्या भाताचा हाताचा थोडा दाब देऊन एक थर तयार करा. आता तयार केलेल्या भाज्यांचा एक थर द्या ( थोड्या भाज्या राखून ठेवा ).
पुन्हा उरलेल्या भाताचा थर पहिल्या प्रमाणे त्यावर तयार करा आणि त्यावर उरलेला भाज्यांचा थर 
तयार करा.
आता भांडे फॉइल ने व्यवस्थित बंद करा आणि ओवन मधे १५ मिनिटांसाठी बेक करा.

कोथिंबीरीची पाने घालून गरम गरम सर्व करा


 


Sunday 14 July 2013

ताज्या नारळाच्या खोबरयाची चटणी ( साउथ )

साहित्य 

एक कप ताज्या  नारळाचे  खोवलेल किंवा बारीक केलेले खोबरे,
अर्धा कप तूर डाळ, पाव कप उडीद डाळ, पाव कप चणा डाळ,
पाव टी स्पून चिंचेचा कोळ, पाव टी स्पून हिंग पावडर,
अक्ख्या ३ ते ४ लाल मिरच्या अंदाजानुसार,
चवीनुसार मीठ, २ टी स्पून तेल.

कृती 

तूर डाळ, उडीद डाळ, चणा  डाळ कोरडे भाजून घ्या.
त्यांमध्ये थोडे तेल न हिंग घाला व पुन्हा थोडावेळ भाजून घ्या.
मिक्सर मध्ये वरील सर्व व पाणी घालून बारीक पेस्ट करून घ्या.
आता त्यात खोबरे, चिंचेचा कोळ आणि मीठ घालून पुन्हा मिक्सर मध्ये फिरवून घ्या 
मिश्रण एकजीव झाल्याची खात्री करा.

हि चटणी गरम गरम भाताबरोबर किंवा डोश्या बरोबर सर्व करा.






एकदम सोप्पी फ्राईड फिश ( प्रकार दुसरा )

साहित्य 

एक पापलेट, सुरमई किंवा रावस चे तुकडे,
मीठ चवीनुसार,  ४ ते ६ लसून पाकळ्या, 
२ टी स्पून चिंचेचा कोळ, तेल अंदाजानुसार,
२ टी स्पून तिखट ( लाल तिखट ), तांदळाचे पीठ.

मसाला : 

लसून पाकळ्या, चिंचेचा कोळ, लाल तिखट, थोडेसे मीठ अंदाजानुसार,
एकत्र करून बारीक वाटून घ्यावे.

कृती

 
माशांचे तुकडे स्वच्छ करून व धुवून घ्यावेत.
कोरडे करून त्यांना मसाला लावून तासभर मुरत ठेवावेत.
पॅन मध्ये तेल अंदाजानुसार घेऊन गरम करावे 
माशांचा एक एक तुकडा तांदळाच्या पिठात घोळून 
पॅन मध्ये घालावा, दोन्ही बाजूंनी तांबूस  व कडक होई पर्यंत परतावा.


गरम गरम भाकरी बरोबर किंवा रोटी बरोबर वाढवा.


एकदम सोप्पी फ्राईड फिश

साहित्य

एक पापलेट , रावस किंवा सुरमईचे तुकडे.
तुकडे तळण्यासाठी तेल अंदाजानुसार,
तांदळाचे पीठ अंदाजानुसार, १ टी स्पून हळद,
१ टी स्पून तिखट ( लाल तिखट ).


कृती 

सुरुवातीला तुकडे स्वच्छ करावेत अन धुवावेत.
त्यांना भरपूर बारीक मीठ लावून ते ३ त ४ तास मुरत ठेवावेत.
माशांचे तुकडे पुन्हा स्वच्छ धुवून नंतर कोरडे करावेत. 
त्यांना हळद मीठ चोळून पुन्हा थोडा वेळ मुरत ठेवावेत.
पॅन मध्ये पुरेसे तेल घेऊन ते थोडे गरम होऊ द्यावे.
आता एक एक माशाचा तुकडा तांदळाच्या पीठात घोळून 
दोन्ही बाजूनी तांबूस व कडक होई पर्यंत परतावा व डिश मध्ये काढावा 


गरम गरम भाकरी किंवा रोटी बरोबर वाढावा.