Wednesday, 8 January 2014

आलू टिक्की

साहित्य 

६ ते ७ मध्यम आकाराचे बटाटे,
२ ते ३ हिरव्या मिरच्या,
१ टी स्पून आमचूर पावडर,
१ टी स्पून जिरे पावडर,
१ टी स्पून लाल मिरची पावडर,
१ टी स्पून आले पेस्ट,
१ टेबल स्पून बारीक चिरलेली कोथिंबीर,
मीठ चवीनुसार,
तेल अंदाजे.

कृती 

बटाटे उकडून त्यांची साल काढून घ्या. हे बटाटे थंड झाल्यावर हाताने कुस्करून घ्या.
आता त्यात हिरव्या मिरच्या (आवडीनुसार ) बारीक चिरून, आमचूर पावडर, जिरे पावडर, लाल मिरची पावडर, आले पेस्ट, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घाला व हाताने मिश्रण एकजीव करा. 
         आता हाताला तेल लावून त्यावर छोटे छोटे वरील मिश्रणाचे गोळे तयार करा. दोन्ही हाताने गोळ्याला मध्ये थोडा दाब देवून चपटे करून घ्या.
          आता एका पसरट पॅन मध्ये थोडेसे तेल गरम करून त्यावर ह्या पॅटीज दोन्ही बाजूनी सोनेरी तांबूस होईपर्यंत भाजून घ्या.

चिंचेच्या चटणीबरोबर आलू टिक्की सर्व करा.

कांदा भजी

साहित्य 

दीड कप बेसन पीठ,
२ मध्यम  आकाराचे कांदे,
२ टी स्पून ओवा,
अर्धा टी स्पून लाल मिरची पावडर,
१ टेबल स्पून बारीक चिरलेली कोथिंबीर,
मीठ चवीनुसार,
तेल तळण्यासाठी,
पाणी अंदाजे.

कृती 

कांदे लांबट आकाराचे चिरून घ्या. एका खोलगट भांड्यात बेसन पीठ, चिरलेले कांदे, ओवा. लाल मिरची पावडर, कोथिंबीर व चवीनुसार मीठ घालून मिश्रण एकजीव करा व पाणी सुटण्यासाठी १० ते १५ मिनिटे  ठेवून द्या.
आता वरील मिश्रणात अंदाजे पाणी घालत मिश्रणाची जाडसर पेस्ट करून घ्या.
         एका खोलगट पॅन मध्ये तळण्यासाठी तेल गरम करून घ्या. तेल व्यवस्थित तापल्यावर हाताने त्यात थोडे थोडे वरील मिश्रण सोडा. भजी लालसर होईपर्यंत तळून बाहेर काढा.

पुदिना किंवा चिंचेच्या चटणीबरोबर गरम गरम कांदा भजी वाढा.

तीळ भात

साहित्य 

२ कप बासमती तांदूळ,
१ कप तीळ,
२ ते ३ टेबल स्पून तिळाचे तेल,
१ टी स्पून मोहरी,
१० ते १२ कडीपत्ता पाने,
अर्धा टेबल स्पून लिंबाचा रस,
मीठ चवीनुसार,
पाणी अंदाजे.

कृती 

तांदूळ स्वच्छ धुवून एका खोलगट भांड्यात घ्या. त्यात अंदाजे पाणी व चवीनुसार मीठ घालून एक उकळी काढा. आता घट्ट झाकण लावून मंद आचेवर भात २० ते २२ मिनिटे शिजू द्या.
          आता एका पॅन मध्ये तिळाचे तेल (अंदाजे ) गरम करून त्यात मोहरी, कडीपत्ता पाने टाका.मोहरी तडतडू द्या. कडीपत्ता पाने तांबूस रंगाची होईपर्यंत परतून घ्या. आता त्यात तीळ टाका. चमच्याने मिश्रण सारखे हलवत राहा. मंद आचेवर तीळ सोनेरी तांबूस होईपर्यंत परतून घ्या. 
            आता भातामध्ये वरील मिश्रण घाला व चमच्याने ढवळून एकजीव करा. चवीनुसार लिंबाचा रस त्यात घाला.

आमटी बरोबर गरम गरम वाढा.

पनीर भाजी

साहित्य 

३०० ग्रॅम पनीर,
१ मध्यम आकाराचा कांदा,
४  मध्यम आकाराचे टोमॅटो,
२ ते ३ हिरव्या मिरच्या,
१ टी स्पून आले पेस्ट,
अर्धा टी स्पून लाल तिखट,
अर्धा टी स्पून गरम मसाला,
१ टेबल स्पून कोथिंबीर बारीक चिरून,
२ टेबल स्पून टोमॅटो सॉस,
३ ते ४ टेबल स्पून तूप किंवा लोणी,
२ ते ३ वेलची ठेचलेली,
पाव कप दही,
अर्धा कप दुध,
मीठ चवीनुसार,
अंदाजे पाणी.

कृती 

सुमारे पाव किलो पनीरचे बारीक १ ते २ इंच आकाराचे तुकडे करून बाजूला ठेऊन द्या.
कांद्याचे उभे लांबसर तुकडे करून घ्या. मिरच्या व टोमॅटो  बारीक  चिरून घ्या. एका खोलगट भांड्यात अर्धे तूप किंवा लोणी गरम करा. त्यात कांदे, चिरलेल्या मिरच्या व वेलच्या (ठेचून), आले पेस्ट टाका. कांदे सोनेरी तांबूस होईपर्यंत परतून घ्या.आता त्यात बारीक चिरलेला टोमॅटो टाका व मंद आचेवर ८ ते १० मिनिटांसाठी मिश्रण परतून घ्या.
आता त्यात दही घालून मिश्रण ५ ते ६ मिनिटे शिजवून घ्या. आता वरील मिश्रणात अंदाजे अर्धा कप पाणी घालून मिश्रण थंड होण्यासाठी ठेवून द्या.   
          आता वरील मिश्रण मिक्सर मध्ये लावून एकदम बारीक पेस्ट करून घ्या.
आता उरलेले तूप किंवा लोणी एका खोलगट भांड्यात गरम करून त्यात वरील मिश्रण टाका. त्यात गरम मसाला, लाल तिखट, टोमॅटो सॉस, चवीनुसार मीठ टाका व मिश्रण ढवळून एकजीव करा. मिश्रणाला एक उकळी काढून मिश्रण घट्ट होईपर्यंत मंद आचेवर ठेवा.
           वाढण्याआधी मिश्रण गरम करा आणि त्यात दुध आणि पनीरचे तुकडे टाका आणि ३ ते ४ मिनिटांसाठी एक उकळी काढून घ्या. उरलेले पनीर किसून आणि कोथिंबीर बारीक चिरून वरून पसरून टाका.

पराठ्याबरोबर गरम गरम वाढा.

साउथ इंडिअन भात ( दह्यातला भात )

साहित्य 

अडीच कप बासमती तांदूळ,
३ ते ४ कप दही,
१ टी स्पून जिरे,
१ टी स्पून मोहरी,
पाव टी स्पून हिंग पावडर,
३ ते ४ लाल मिरच्या,
१ टेबल स्पून उडीद डाळ,
२ टेबल स्पून तूप किंवा तेल,
४ ते ५ कप पाणी,
मीठ चवीनुसार.

कृती 

          तांदूळ स्वच्छ धुवून थोडावेळ त्यातले पाणी काढून ठेवून द्या.
एका खोलगट भांड्यात तांदूळ घेऊन त्यात अंदाजे पाणी व मीठ घालून एक उकळी काढा. आता भात मंद आचेवर घट्ट झाकण लावून शिजण्यास २० ते २५ मिनिटांसाठी ठेवून द्या. भात शिजल्यावर तो बाजूला थंड होण्यासाठी ठेवून द्या.
          आता एका पॅन मध्ये तेल किंवा तूप घेऊन त्यात जिरे, मोहरी आणि हिंग पावडर घालून मोहरी तडतडू द्या. आता त्यात उडीद डाळ घाला. उडीद डाळ तांबूस सोनेरी होईपर्यंत परतून घ्या. लाल मिरच्या (अंदाजे ) त्यांची पोटे फोडून अक्ख्या वरील फोडणीत घाला व २ ते ३ मिनिटांसाठी परतून घ्या.
            एका भांड्यात दही घेऊन त्यात हि फोडणी वरून घाला व चमच्याने ढवळून मिश्रण एकजीव करा. चवीनुसार मीठ घाला.
             एका खोलगट भांड्यात भात घेऊन त्यात वरील मिश्रण घाला व चमच्याने ढवळून भात व दही एकजीव करा. दही आवडीनुसार कमी किंवा जास्त वापरू शकता.

हा भात थंडच जेवताना वाढा.



Thursday, 26 December 2013

गोबी मंचुरिअन

साहित्य 

१ मध्यम आकाराचा कॉलीफ्लॉवर ,
१ मध्यम आकाराचा कांदा,
१ टी स्पून आले पेस्ट,
२ टी स्पून लसूण पेस्ट,
२ ते ३ टेबल स्पून कॉर्न फ्लोर,
पाव कप गव्हाचे पीठ,
पाव टी स्पून लाल मिरची पावडर,
२ ते ३ लाल मिरच्या,
३ ते ४ टेबल स्पून तेल,
मंचुरिअन  सॉस आवडीप्रमाणे,
२ कप पाणी,
मीठ चवीनुसार.

कृती 

कॉलीफ्लॉवर  चे तुरे व्यवस्थित कापून घ्या. १ ते २ वेळा धुवून स्वच्छ करून  घ्या. एका खोलगट भांड्यात पाणी गरम करून त्यात हे तुरे ४ ते ५ मिनिटांसाठी उकळून घ्या. हे तुरे पाण्यातून बाजूला एका कोरड्या कापडावर ठेवून द्या.
            आता एका भांड्यामध्ये पाव कप गव्हाचे पीठ, २ टेबल स्पून कॉर्न फ्लोर, प्रत्येकी पाव चमचा आले पेस्ट, लसूण पेस्ट, लाल मिरची पावडर, आणि चवीप्रमाणे मीठ एकत्र करा. त्यात अंदाजे पाणी घालत भज्याच्या पिठाप्रमाणे पीठ तयार करून घ्या.
             बाजूला ठेवलेले तुरे वरील मिश्रणात व्यवस्थित बुडवून घ्या. आता एका खोलगट पॅन मध्ये तेल गरम करून त्यातून हे तुरे तळून काढा व बाजूला ठेवून द्या.
             आता उरलेल्या तेलामध्ये शिल्लक राहिलेले लसूण पेस्ट व आले पेस्ट आणि ठेचलेल्या लाल मिरच्या 
( आवडीनुसार ) घालून मिश्रण १ ते २ मिनिटांसाठी परतून घ्या. आता त्यात कांदा बारीक चिरून घाला चवीनुसार मीठ घाला. कांदा हलकासा सोनेरी तांबूस झाल्यावर त्यात दीड कप पाणी घाला व एक उकळी काढा.
             आता उरलेले  कॉर्न फ्लोर अर्धा कप पाण्यात व्यवस्थित मिसळून घ्या. हे मिश्रण वरील मिश्रणात हलके हलके मिसळा. मिसळताना चमच्याने सारखे ढवळत राहा. आता ५ ते ७ मिनिटांसाठी हे मिश्रण मंद आचेवर ठेवा. 
             आता वरील मिश्रणात कॉलीफ्लॉवर  चे तुरे व्यवस्थित हलक्या हाताने मिसळा तसेच मंचुरिअन  सॉस ( आवडीप्रमाणे ) घाला. १ ते २ मिनिटांसाठी मध्यम आचेवर ठेवून एक उकळी काढा.

भाताबरोबर गरम गरम सर्व करा.


पुलाव ( प्रकार २)

साहित्य 

३ कप बासमती तांदूळ,
२ ते ३ टोमॅटो,
४ ते ५ लसून पाकळ्या,
१ टेबल स्पून आले पेस्ट,
४ ते ५ काळी मिरी,
२ ते ३ लवंगा,
१ मध्यम कांदा,
६ ते ८ टी स्पून तूप,
पाणी अंदाजे,
मीठ चवीनुसार.

कृती 

         तांदूळ स्वच्छ धुवून घ्या व बाजूला काढून ठेवा.
एका खोलगट पॅन मध्ये तूप मध्यम आचेवर गरम करा. कांदा बारीक चिरून घ्या व तो त्या पॅन मध्ये सोनेरी तांबूस होईपर्यंत भाजून घ्या. त्यात आले पेस्ट, लसणाचे बारीक तुकडे करून, काळी मिरी ( आवडीनुसार ), लवंगा (आवडीनुसार ) घाला व २ ते ३ मिनिटांसाठी मिश्रण परतून घ्या. त्यात चवीनुसार मीठ घाला.
          मिक्सर ला लावून टोमॅटोची पातळ पेस्ट करून घ्या. ती पेस्ट वरील मिश्रणात घाला व चमच्याने ढवळून मिश्रण एकजीव करा. १ ते २ मिनिटानंतर त्यात बासमती तांदूळ घाला. १ ते २ मिनिटांसाठी मिश्रण परतून घ्या. चमच्याने हळुवार ढवळत रहा जेणेकरून तांदळाला सर्व मिश्रण लागेल.
          आता त्यात अंदाजे पाणी घालून पॅनला घट्ट झाकण लावून भात शिजू द्या.

आमटीबरोबर गरम गरम सर्व करा.

         

घी राईस

साहित्य 

१ कप बासमती तांदूळ,
१ ते २ मध्यम कांदे,
२ ते ३ हिरव्या मिरच्या,
अर्धा टी स्पून जिरे,
१ लवंग,
१ टी स्पून आले पेस्ट,
१ टी स्पून लसून पेस्ट,
७ ते ८ सुके काजू,
१ टेबल स्पून तूप  ( घी ),
१ टेबल स्पून बारीक चिरलेली कोथिंबीर,
पाणी अंदाजे,
मीठ चवीनुसार.

कृती 

तांदूळ पाण्याने स्वच्छ धुवून १० मिनिटांसाठी बाजूला ठेवून द्या.
एका खोलगट भांड्यात तूप घेऊन त्यात जिरे, लवंग, आले-लसून पेस्ट , काजू , हिरव्या मिरच्या तुकडे करून टाका व मिश्रण हलवून घ्या. मंद आचेवर १ ते २ मिनिटे ठेवा. आता त्यात कांदे बारीक चिरून टाका व सोनेरी तांबूस होईपर्यंत भाजून घ्या. आता त्यात तांदूळ घाला व मिश्रण चमच्याने हलवून एकजीव करा. २ ते ३ मिनिटांसाठी मंद आचेवर ठेवा. चमच्याने मिश्रण सारखे हलवत राहा.
           आता त्यात २ कप ( अंदाजे ) पाणी व चवीनुसार मीठ घालून भात मंद आचेवर शिजू द्या. 

 गरम गरम भातावर कोथिंबीर पसरून कोशिंबीरीबरोबर सर्व करा.

Wednesday, 25 December 2013

टोमॅटो भात

साहित्य 

१ कप बासमती तांदूळ,
२ ते ३ मध्यम टोमॅटो,
१ ते २ मध्यम कांदे,
२ ते ३ हिरव्या मिरच्या,
अर्धा टेबल स्पून आले पेस्ट,
अर्धा टेबल स्पून लसून पेस्ट,
१ टेबल स्पून बारीक चिरलेली कोथिंबीर,
१ ते २ लवंगा,
अर्धा टी स्पून काळी मिरी पावडर,
अर्धा टी स्पून दालचिनी पावडर,
१ ते २ वेलदोडे ठेचून,
१ तमाल पत्री,
तेल आवश्यकतेनुसार,
मीठ चवीनुसार.

कृती 

 तांदूळ २ ते ३ वेळा स्वच्छ धुवून १० मिनिटांसाठी बाजूला ठेवा.
               एका खोलगट पॅन मध्ये आले पेस्ट, लसून पेस्ट, लवंगा, मिरी पावडर, दालचिनी पावडर, वेलदोडे ठेचून, तमाल पत्री आणि कांदे बारीक चिरून टाका. तेल आवश्यकतेनुसार वापरा. कांदे तांबूस सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या. चमच्याने मिश्रण हलवत राहा. ५ ते १० मिनिटे मंद आचेवर ठेवा व चवीनुसार मीठ घाला.
              आता टोमॅटो बारीक चिरून वरील मिश्रणात टाका आणि चमच्याने हलवून मिश्रण एकजीव करा. १ ते २ मिनिटे मंद आचेवर ठेवा.
               आता त्यात तांदूळ घाला व पुन्हा मिश्रण एकजीव करा. ३ ते ४ मिनिटांसाठी मिश्रण मंद आचेवर ठेवा व चमच्याने हलवत राहा जेणेकरून तांदळाला सर्व मिश्रण लागेल. आता त्यात अंदाजे पाणी घालून मिश्रण एकजीव करा. भात शिजेपर्यंत घट्ट झाकण लावून मंद आचेवर ठेवा.

वाढताना कोथिंबीर बारीक चिरून भातावर पसरवा व गरम गरम सर्व करा. 
               
 

Tuesday, 24 December 2013

पुलाव ( प्रकार १ )

साहित्य 

अडीच कप बासमती तांदूळ,
३ टेबल स्पून तूप किंवा तेल,
१ ते २ मध्यम आकाराचे कांदे,
२ दालचिनी काड्या,
६ वेलची ठेचलेल्या,
५ ते ६ लवंगा,
१० ते १२ काळी मिरी,
४ ते ५ कप पाणी,
मीठ आवडीनुसार.

कृती 

बासमती तांदूळ २ ते ३ वेळा पाण्यामध्ये धुवून घ्या व तासाभरासाठी भिजत ठेवा. नंतर त्यातील पाणी काढून बाजूला ठेवून द्या.
             एका खोलगट पॅन मध्ये तेल किंवा तूप गरम करा. त्यात दालचिनी, वेलची, लवंगा, काळी मिरी घाला.
आता दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून वरील मिश्रणात घाला. मंद आचेवर कांदा तांबूस सोनेरी होईपर्यंत परतून घ्या.
             आता त्यात तांदूळ घाला व मिश्रण ढवळून एकजीव करा. ३ ते ४ मिनिट मंद आचेवर ठेवा व मिश्रण सारखे हलवत राहा. आता त्यात अंदाजे पाणी घालून एक उकळी काढा. 
             मंद आचेवर पॅनला घट्ट झाकण लावून २० ते २५ मिनिटे भात शिजू द्या. आता भातावर असलेले  अख्खे मसाले बाजूला काढून टाका.

पुलाव गरम गरम आमटी बरोबर सर्व करा.
 

राजमा भात

साहित्य 

दीड वाटी  बासमती तांदूळ,
अर्धी  वाटी राजमा,
अर्धा टी स्पून सांबार मसाला,
१ टी स्पून लाल मिरीची पूड,
पाव टी स्पून हळद पावडर,
२ लाल मिरच्या,
३ ते ४ कडीपत्ता पाने,
१ मध्यम कांदा,
१ मध्यम टोमॅटो,
१ टेबल स्पून कोथिंबीर बारीक चिरलेली,
अर्धा टेबल स्पून जिरे,
अर्धा टेबल स्पून मोहरी,
अर्धा टेबल स्पून उडीद डाळ,
३ टेबल स्पून तेल,
१ टेबल स्पून लिंबाचा रस,
मीठ आवश्यकतेनुसार.

कृती 

राजमा रात्रभर पाण्यामध्ये भिजवून ठेवा. भिजवलेला राजमा कुकरला लावून १ ते २ शिट्या काढून घ्या.
राजमा त्यातील पाणी काढून बाजूला थंड करण्यासाठी ठेवून द्या .
बासमती तांदूळ अर्धा तास पाण्यात भिजवून घ्या. हा तांदूळ पण कुकरला लावून १ ते २ शिट्या काढून घ्या.
तांदूळ बाजूला थंड होण्यासाठी ठेवून द्या.
             एका खोलगट पॅन  मध्ये तेल गरम करून त्यात जिरे, मोहरी, उडीद डाळ टाका. मोहरी तडतडल्यावर 
त्यामध्ये कडीपत्ता पाने, आणि अक्ख्या लाल मिरच्या टाका. मिश्रण हलवून एकजीव करा.
आता एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून वरील मिश्रणात घाला व गुलाबी होईपर्यंत मध्यम आचेवर परतून घ्या.
             आता वरील मिश्रणात सांबार मसाला, हळद, मिरीची पुड, राजमा, लिंबाचा रस आणि मीठ (चवीप्रमाणे ) घालून मिश्रण एकजीव करा. आता त्यात एक टोमॅटो बारीक चिरून घाला व मिश्रण ढवळून एकजीव करा.
              आता त्यात तांदूळ घालून चमच्याने हळुवार मिश्रण एकजीव करा जेणेकरून तांदळाला सर्व मिश्रण लागेल. मंद आचेवर २ ते ३ मिनिटे झाकण लावून भात शिजू द्या.

बारीक चिरलेली कोथिंबीर भातावर पसरवून गरम गरम वाढा.

Saturday, 12 October 2013

कोबी वडे

साहित्य 

एक वाटी बारीक चिरलेला कोबी,
अर्धा वाटी हरभरा डाळीचे पीठ,
३ ते ४ हिरव्या मिरच्या,
अर्धा टी स्पून हळद,
अर्धा टी स्पून जिरे,
एक टी स्पून आले लसूण पेस्ट,
अंदाजे तेल,
मीठ चवीनुसार.

कृती

एका खोलगट भांड्यात बारीक चिरलेला कोबी, डाळीचे पीठ, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या ( आवडीनुसार ) एकत्र करा. आता त्यात हळद, जिरे आणि आले लसूण पेस्ट घालून मिश्रण एकजीव करा.
   आता अंदाजे पाणी घालत कणके सारखे घट्ट पीठ माळून घ्या. आता या कणकेच्या सुरळ्या करून त्या कुकरमध्ये वाफवून घ्या. किंवा एका खोलगट भांड्यात पाणी घेऊन त्यावर चाळणीत ह्या सुरळ्या ठेऊन वाफवून घ्या. 
    सुरळ्या थंड झाल्यावर त्यांचे काप करा व गरम तेलात तळा किंवा फोडणीवर परतून घ्या.

जेवताना चटणीबरोबर सर्व करा कोबी वडे.

मेथीचे वडे

साहित्य 

एक वाटी हरभरा डाळ पीठ,
पाव वाटी मैदा,
एक वाटी चिरलेली मेथी,
एक टी स्पून मेथी पावडर,
एक टी स्पून तीळ,
एक टी स्पून हळद,
अर्धा टी स्पून हिंग पावडर,
एक टेबल स्पून रवा भाजून,
तेल आवश्यकतेनुसार,
मीठ चवीनुसार.

कृती 

डाळीचे पीठ, रवा, मैदा, बारीक चिरलेली मेथी एका भांड्यात एकत्र करा . 
आता त्या मिश्रणात हळद, हिंग, मेथी पावडर आणि चवीनुसार मीठ टाकून मिश्रण एकजीव करा.
अंदाजे २ टी स्पून गरम तेल घाला. आता अंदाजे पाणी घालत घट्ट कणिक मळून घ्या.
आता त्या पिठाची सुरळी करा. एका कुकरच्या भांड्यात ह्या सुरळ्या ठेऊन वाफवून घ्या  किंवा
एका खोलगट पातेल्यात पाणी घेऊन त्यावर चाळणीत सुरळ्या ठेवा व झाकण लावून वाफवून घ्या.
व्यवस्थित वाफवल्यावर त्या थंड होऊ द्या. आता त्यांचे चाकूने अंदाजे काप करा.
        हे काप गरम तेलात टाळून काढा अथवा त्यांना फोडणी द्या.

जेवताना चटणीबरोबर सर्व करा मेथीचे वडे.


Monday, 5 August 2013

पालक पराठा

साहित्य 

२ वाट्या चिरलेला पालक,
१ वाटी गव्हाचे पीठ,
पाव वाटी चणा डाळीचे पीठ,
३ ते ४ हिरव्या मिरच्या,
१ टी स्पून लसून पेस्ट,
१ टी स्पून जिरे पावडर,
तेल अंदाजे,
मीठ चवीनुसार.

कृती

 गरम पाण्यात पालक पाने  २ ते ३ मिनिटांसाठी भिजवून घ्या. आता एका खोलगट भांड्यात गव्हाचे पीठ, डाळीचे पीठ, बारीक केलेली हिरवी मिरची ( आवडीनुसार ), लसून पेस्ट, जिरे पावडर, आणि पालक यांचे मिश्रण तयार करा. आता त्यात अंदाजे पाणी घालत कणिक मळून घ्या. थोडे तेल कणकेला लावा. हि कणिक तासाभरासाठी मुरत ठेवा. 
          आता त्या कणकेचे गोळे तयार करून चपातीप्रमाणे  लाटून घ्या. एका पॅनला तेल लावून त्यावर हे पराठे खरपूस भाजून घ्या. आवश्यकतेनुसार बाजूने तेल सोडा.

पुदिन्याच्या चटणी बरोबर किंवा कुठल्याही चटणी बरोबर गरम गरम पालक पराठे सर्व करा.  

चीज पालक भात

साहित्य 

३ कप पालक पाने,
२ कप बासमती तांदूळ,
१ कप कोबी बारीक लांब चिरून,
१ मध्यम आकाराचा कांदा,
अर्धा कप चीजचे बारीक तुकडे
पाव कप दुध,
४ ते ५ हिरव्या मिरच्या,
१ टेबल स्पून लोणी,
१ टी स्पून आले पेस्ट,
पाव चमचा दालचिनी पावडर,
पाव चमचा लवंग पावडर,
१ टेबल स्पून लिंबाचा रस,
मीठ चवीला.

कृती

एका खोलगट भांड्यात भरपूर पाणी उकळून घ्या. आता त्यात अंदाजे मीठ व १० ते १२ थेंब लिंबाचा रस घालून त्यात तांदूळ घाला व भात शिजवून घ्या. भात थोडासा कमी शिजलेला ठेवा. हा भात एका पसरट प्लेट मध्ये पसरून थंड करून बाजूला ठेवून द्या.
         आता पालक, हिरव्या मिरच्या ( आवडीनुसार ), आणि आले पेस्ट मिक्सर मध्ये बारीक करून घ्या ( पाणी वापरू नका ).
          एका पॅन मध्ये लोणी गरम करून त्यात लवंग-दालचिनी पावडर, हिंग पावडर टाका. मिनिटभर मिश्रण परतून घ्या. आता त्यात लांबसर चिरलेला कांदा टाका व हलका गुलाबी सोनेरी होई पर्यंत परतून घ्या. आता त्यात कोबी लांबसर बारीक चिरून टाका. लिंबाचा रस, आणि पालक पेस्ट टाका. मीठ चवीनुसार टाकून मिश्रण हलवून एकजीव करून घ्या. मंद आचेवर ५ ते ६ मिनिटे मिश्रण परतून घ्या. मधे मधे मिश्रण हलवत राहा.
          आता वरील मसाला थोडासा शिल्लक ठेवून उरलेला भातात टाका. अर्धे चीज थोडेसे ठेचून त्यात टाका व मिश्रण हलक्या हाताने हलवून एकजीव करा.
           आता ओवन च्या खोलगट भांड्यात वरील भात घ्या आणि उरलेला मसाला त्यावर पसरा व एक थर तयार करा. उरेलेल चीज त्यावर सगळीकडे पसरून टाका. दुधही त्यात सगळीकडे पसरून टाका.
           हा भात ओवन मध्ये १५ मिनिटांसाठी फोइल ने झाकून बेक करून घ्या.

गरम गरम भात  

मटार पुलाव

साहित्य 

२ कप बासमती तांदूळ,
दीड कप हिरवे मटार,
अर्धा कप बारीक तुकडे केलेले गाजर,
१ टेबल स्पून तूप,
अर्धा टी स्पून दालचिनी पावडर,
३ ते ४ वेलच्या ठेचून,
३ ते ४ लवंग,
१ टी स्पून जिरे,
अर्धा टी स्पून हळद,
मीठ चवीनुसार.

कृती 

तांदूळ धुवून अर्धा तासासाठी बाजूला ठेवा. एका खोलगट पॅन मध्ये तूप गरम करून त्यात लवंग, दालचिनी पावडर, वेलची आणि जिरे टाका. मिनिटभरासाठी मिश्रण परतवून घ्या. आता त्यात हळद व तांदूळ टाकून मिश्रण एकजीव करून घ्या. अंदाजे ३ ते ४ मिनिटांसाठी मंद आचेवर ठेवा.  
         आता वरील मिश्रणात हिरवे मटार आणि गाजराचे तुकडे टाका. नंतर त्यात अंदाजे गरम पाणी ओतून मिश्रण एकजीव करा. एक उकळी काढा. पॅनला एक घट्ट झाकण लावून २० ते २५ मिनिटे भात मंद आचेवर शिजू द्या. 


गरम गरम भात आमटी बरोबर सर्व करा.

Tuesday, 30 July 2013

आलू पालक

साहित्य

१ मध्यम आकाराची पालक जुडी,
२ ते ३ हिरव्या मिरच्या,
१ मध्यम आकाराचा टोमॅटो,
२ मध्यम आकाराचे बटाट,
२ मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून,
२ टी स्पून आले पेस्ट,
अर्धा टी स्पून  स्पून गव्हाचे पीठ,
पाव टी स्पून हिंग पावडर,
अर्धा टी स्पून लोणी,
१ टेबल स्पून लिंबाचा रस,
१ टी स्पून जिरे,
४ टेबल स्पून तूप,
मीठ चवीनुसार.

मसाले 

अर्धा टी स्पून लवंग पावडर,
अर्धा टी स्पून दालचिनी पावडर,
अर्धा टी स्पून गरम मसाला, 
पाव टी स्पून हळद,


कृती

पालक धुवून निवडून घ्या. एका भांड्यात पाणी उकळून त्यात २ ते ३ मिनिटांसाठी पालक बुडवून ठेवा किंवा कुकरमध्ये निवडलेल्या पालकास दोन शिट्या काढून घ्या. आता हा पालक थंड पाण्याच्या धारेखाली धरून लगेच थंड करा. आता मिक्सर मध्ये पालक आणि हिरव्या मिरच्या बारीक करून घ्या. पालकाची बारीक पेस्ट होणार नाही याची काळजी घ्या.
           बटाटे उकडून, सोलून त्यांचे मोठे मोठे तुकडे करून घ्या  एका खोलगट पॅन मध्ये गरम तुपा मध्ये बटाटे चांगले परतून घ्या. बटाटे थोडे तांबूस होऊ द्या. बटाटे बाजूला काढून घ्या.
           आता त्याच पॅन मध्ये जिरे, आले पेस्ट आणि कांदे परतवून घ्या. कांदे सोनेरी तांबूस होऊ द्या. आता त्यात टोमॅटो  बारीक चिरून टाका आणि २ ते ३ मिनिटांसाठी मंद आचेवर मिश्रण परता.
           आता त्यात सर्व मसाले टाकून मिश्रण मंद आचेवर तूप सुटेपर्यंत ठेवा. मधून मधून हलवत राहा जेणेकरून सर्व मसाले एकजीव होतील.
            आता त्यात पालक आणि बटाटे टाका व एक उकळी काढा. त्यात गव्हाचे पीठ टाकून मिश्रण एकजीव करा. २ त ३ मिनिटे मंद आचेवर ठेवा. मिश्रणात लिंबाचा रस टाका.
             सर्व करण्याआधी एका पॅन मध्ये लोणी गरम करून त्यात हिंग पावडर टाका व हे मिश्रण भाजीवर टाका आणि चमच्याने हलवून एकजीव करा.

तंदुरी रोटी किंवा नान बरोबर गरम गरम आलू पालक सर्व करा.



Thursday, 25 July 2013

गव्हाची खिचडी

साहित्य 

२ वाट्या गव्हाचा (लापशी) रवा,
पाव वाटी शेंगदाण्याचे कूट,
२ मध्यम आकाराचे बटाटे,
१ मिरची बारीक चिरलेली,
१ टेबल स्पून कोथिंबीर बारीक चिरलेली,
१ टी स्पून जिरे,
२ टेबल स्पून तेल,
१ टेबल स्पून लिंबाचा रस,
साखर आवडीनुसार,
मीठ चवीला.

कृती 

थोड्या तेलावर रवा खरपूस भाजून घ्या वास आला कि थांबा. एका खोलगट पॅन मध्ये तेल गरम करा त्यात मिरची बारीक चिरून व जिरे टाका. बटाटे बारीक चिरून त्यात टाका. एक वाफ काढा. आता त्यात साखर व मीठ घाला. शेंगदाण्याचे कूट घालून मिश्रण हलवून एकजीव करा. आता त्यात गव्हाचा रवा टाका. हलवा व मिश्रण एकजीव करा. आता त्यात अंदाजे गरम पाणी ओतून झाकण लावा. मंद आचेवर मिनिटभर शिजवा व एक वाफ काढा.

गरम गरम खिचडी लिंबाचा रस टाकून सर्व करा.
 

भरली भेंडी

साहित्य 

१० ते १२ कोवळ्या भेंड्या,
१ टेबल स्पून बेसन.

 वाटण 

२ ते ४ कडीपत्ता पाने,
अर्धा टी स्पून धने पूड,
अर्धा टी स्पून जिरे पूड,
अर्धा टी स्पून हळद,
१ टी स्पून लाल तिखट,
१ टेबल स्पून लिंबाचा रस,
२ टेबल स्पून बारीक चिरलेली कोथिंबीर,
१ टेबल स्पून ओले खोबरे बारीक केलेले,
साखर आवडीनुसार,
मीठ चवीला.

कृती 

लहान लहान आकाराच्या कोवळ्या भेंड्या घेऊन त्या ओल्या फडक्याने पुसून कोरड्या करून ठेवाव्यात. वरील सर्व पदार्थ भेंड्या व बेसन पीठ सोडून बाकी मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्यावेत. या वाटणात बेसन पीठ मिसळावे व मिश्रण एकजीव करावे. 
         आता भेंड्याना चाकूने सरळ उभी चीर देऊन घ्यावी. त्यात वरील मिश्रण भरावे. मंद आचेवर एका पॅनला तेल लावून त्यावर भरलेल्या भेंड्या व्यवस्थित लावाव्यात व झाकण ठेवावे. खालच्या बाजूने लालसर झाल्यावर हलक्या हाताने भेंड्या परताव्यात.

चपाती किंवा रोटी बरोबर सर्व करा.


मेथी बेसन

साहित्य 

१ वाटी बेसन,
२ टेबल स्पून तांदूळ पीठ,
एक वाटी मेथीची पाने,
अर्धा टी स्पून हिंग,
अर्धा टी स्पून हळद,
२ टी स्पून जिरे,
२ टेबल स्पून तेल,
मीठ चवीला.

कृती 

एका खोलगट पॅन मध्ये तेल गरम करून हिंग, जिरे यांची फोडणी करा. त्यात हळद घाला त्यावर बारीक  चिरलेली मेथीची पाने घाला. झाकण लावून एक वाफ काढा. आता त्यात बेसन पीठ व तांदूळ पीठ घाला. एकसारखे चमच्याने हलवत राहा.चवीला मीठ घाला.थोडा पाण्याचा शिंतोडा द्या. मेथी पाने व बेसन व्यवस्थित मिसळेपर्यंत हलवत राहा. झाकण टाकून एक वाफ काढा.